लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प आजही भरलेले आहेत. निळोणा प्रकल्पात ३९ तर, चापडोह प्रकल्पात ५२ टक्के पाणी आहे. पुढील काळात सध्याच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.निळोणा प्रकल्पाच्या भरवशावर ३५ टक्के तर चापडोहच्या पाण्यावर शहरातील ६५ टक्के लोकांची तहाण भागविली जाते. यासाठी महिन्याकाठी एक दशलक्ष घनमीटर पाणी लागते. आज निळोणा प्रकल्पात पुरेसे पाणी आहेत. मात्र बाष्पीभवन, विविध कारणांमुळे होणारा पाण्याचा अपव्यय यामुळे हा साठा कमी होणार आहे.निळोणा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.३९ दशलक्षम घनमीटरने घटली आहे. या प्रकल्पाची मूळ साठवण क्षमता ६.३९ एवढी आहे. मात्र प्रकल्पात साचलेल्या गाळामुळे आज ४.५० दलघमी एवढेच पाणी या प्रकल्पात जमा होते. प्रकल्पाची साठवण क्षमता कमी झाली असली तरी आज आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होत आहे.दोन वर्षे प्रकल्प कोरडेअपुऱ्या पावसामुळे दोन वर्षे निळोणा व चापडोह प्रकल्प अर्धेही भरले नाही. गतवर्षी या प्रकल्पांनी चांगलाच दगा दिला. डोबऱ्यातून ओढलेले पाणी नळाला सोडले गेले. ४० वर्षांपूर्वीच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या. ही वेळ पुढील काळात येऊ नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दक्षता घेतली जात आहे.
खंडित वीज पुरवठ्याची अडचणवीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी वितरणात अनियमितता येत असल्याचे सांगितले जाते. वीज एक तासही गेल्यास पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडतो. पाईप आणि पाण्याची टाकी भरून नळाला पाणी सोडेपर्यंत जवळपास आठ तास लागतात. यामुळेच काही भागात सहाव्या दिवशी पाणी वितरणात अनियमितता आली असल्याची माहिती मजीप्राकडून देण्यात आली.शहराची पाण्याची गरज पूर्ण होईल एवढा जलसाठा निळोणा आणि चापडोह प्रकल्पात आहे. पुढील काळातही सध्या होत आहे, त्यानुसारच पाणीपुरवठा होईल.- अजय बेले, उप विभागीय अभियंता, मजीप्रा यवतमाळ