लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अत्यंत अडचणीतून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये वाटचाल करीत आहेत. मात्र अशाही परिस्थिती शासनाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती गेल्या दीड वर्षापासून अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांपुढे अडचणींचा डोंगर वाढला आहे. कोरोनाचा संकटकाळ असूनही शासकीय अभियांत्रिकीसह अन्य शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींना नियमित वेतन मिळत आहे. मात्र त्याच तोडीचे किंबहुना त्या पेक्षाही अधिक काम करणाऱ्या खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनियमित वेतनाचा सामना करावा लागत आहे. कारण तब्बल १६ महिन्यांपासून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती रकमा शासनाने रिलीज न केल्याने या महाविद्यालयांचे व्यवस्थापन आर्थिक संकटात आहे. खासगी महाविद्यालयांच्या अडचणींकडे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री लक्ष देतील का, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात तीन खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यवतमाळसारख्या मागास जिल्ह्यात या महाविद्यालयांनी सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वजिल्ह्यातच अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आधार दिला आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपुढे आर्थिक अडचणी वाढल्या. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या शिष्यवृत्ती रकमेतून या महाविद्यालयांची प्रवेश शुल्काची भरपाई होते. परंतु, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या ईबीसी शिष्यवृत्तीच्या रकमा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने रिलिज केलेल्या नाहीत. आता दुसरे सत्र सुरू झाले तरी या रकमा मोकळ्या न झाल्याने महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय अभियांत्रिकीत ६८ पैकी ६७ पदे रिक्त यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ६८ पदे मंजूर असून त्यातील केवळ एक असिस्टंट प्रोफेसर हे पद भरले गेले. तर ६७ पदे अद्यापही भरलेली नाहीत. प्राध्यापक आणि प्राचार्यही नसताना या महाविद्यालयातील ९९३ विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे भवितव्य मात्र अधांतरी झाले आहे. सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्राॅनिक्स, काॅम्प्युटर या विद्याशाखांना प्राध्यापक नाही.