अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम मिळविण्यासाठी बँक खात्यांची माहिती अद्ययावत करण्याची गरज असतानाही बहुतांश मुख्याध्यापक त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ‘११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मुख्याध्यापक खडबडून जागे झाले. तरीही १५ मार्च ही अंतिम तारीख आल्यावरही तब्बल साडेसहा हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता जे मुख्याध्यापक माहिती अपडेट करणार नाहीत, त्यांच्या वेतनातून शिष्यवृत्तीची रक्कम वसूल केली जाईल, अशी तंबी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली आहे.अल्पसंख्यक समाजातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यातील तब्बल एक लाख सात हजार ८९ विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत. ही एक हजार रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यात जमा करावी लागते. परंतु, त्यासाठी दरवर्षी या खात्यांची माहिती संबंधित मुख्याध्यापकाला ‘अपडेट’ करावी लागते. मागील वर्षीची माहिती अपडेट नसल्यास चालू वर्षातील रक्कम जमा केली जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची अपडेट माहिती शिक्षण संचालनालयाकडे देण्याबाबत दुर्लक्ष करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ११ हजार ३२४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संचालनालयाकडे देण्यात आलेली नाही. त्यामुळेच २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन सत्रातील माहिती संचालनालयाने १५ मार्चपर्यंत ‘अपडेट’ करण्याचे निर्देश दिले. परंतु, १५ मार्च ही तारीख आल्यावरही मुख्याध्यापकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. अद्यापही ६ हजार ४२१ विद्यार्थ्यांचे खाते अद्ययावत करण्यात आलेले नाही. आता एका दिवसात ही माहिती आॅनलाईन भरणे शक्य नाही.मुख्याध्यापकांकडून याबाबत हयगय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षाचे बळी अल्पसंख्यक विद्यार्थी ठरू नये, यासाठी आपण संचालनालयाला विनंती करून आणखी एक दिवस मुदत वाढवून घेतल्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे १६ मार्चपर्यंत साडेसहा हजार विद्यार्थ्यांची माहिती अपडेट न झाल्यास दोषी मुख्याध्यापकांच्या वेतनातून शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करणार असल्याचेही सांगितले.मुळात माहिती अपडेट करण्याची मुदत २० फेब्रुवारीपर्यंतच होती. त्यानंतरही दोन-तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ करूनही मुख्याध्यापक गांभीर्याने घेत नसतील, तर त्यांच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याची भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतल्याने खळबळ उडाली आहे.दारव्हा, उमरखेड, महागाव पिछाडीवर४अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बँक खाते अपडेट करण्यात दारव्हा, उमरखेड, महागाव तालुक्यातील मुख्याध्यापक पिछाडीवर आहेत. शेवटची तारीख उजाडल्यावरही दारव्ह्यात ९४२, महागावात ७६९, तर उमरखेड तालुक्यातील १४३४ विद्यार्थ्यांची माहिती अपडेट झालेली नाही. जिल्हास्थळ असलेल्या यवतमाळ तालुक्यातील १५६५ विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आलेली नाही. त्यामुळे या तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या वेतनातून वसुली होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी आर्णी, पुसद तालुक्यातील मुख्याध्यापकांनी अवघ्या चार दिवसात वेगवान पद्धतीने माहिती अपडेट केली आहे. तरी याही तालुक्यात अनुक्रमे २८४ आणि ६२६ खाते अपडेट झालेले नाहीत.
मुख्याध्यापकांच्या वेतनातून शिष्यवृत्तीची वसुली
By admin | Published: March 15, 2016 4:22 AM