लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्या कोरोनाने गेल्या वर्षी शाळा कुलूपबंद केल्या होत्या, तो कोरोना आता थंडावला आहे. त्यामुळे नव्या सत्रासाठी शाळा उघडणार का, हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने कोरोना घटल्याचे कारण पुढे करीत संपूर्ण बाजारपेठ खुली केली, तरी शाळा उघडण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे अनलाॅकच्या आदेशानंतरही जिल्ह्यातील सव्वातीन हजार शाळा बंदच राहणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, नवीन सत्रात शाळा २८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम करणार आहेत. यावरून शाळांमधील वर्गखोल्या बंद अन् स्टाफरूम मात्र सुरू असे चित्र नव्या सत्रात पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या ३३५३ शाळा आहे. त्यापैकी २१०९ जिल्हा परिषद, १४८ शासकीय, ७०२ अनुदानित तर ३९४ विनाअनुदानित आहेत. प्रत्यक्षात विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार आहे. तेथेही केवळ शिक्षकांना शाळेत बोलावण्यात आले आहे. यवतमाळसह विदर्भात दरवर्षीप्रमाणे २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. मात्र २६ व २७ रोजी शासकीय सुटी असल्याने २८ जूनपासून सत्र सुरू होत आहे. कोरोना कमी झालेला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे तूर्त विद्यार्थ्यांना शाळेत न बोलाविता केवळ शिक्षकांना बोलाविले जाणार आहे.
शिक्षणाधिकारी म्हणतात, प्लॅनिंग सुरू आहेमहाराष्ट्रात ज्याप्रमाणे शाळा सुरू झाल्या, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही होतील. शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. मात्र सध्या विद्यार्थ्यांना न बोलाविता त्यांना ऑनलाइन शिकविले जाईल. एससीआरटीमार्फत सेतू वर्ग सुरू होतील. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पाहून ग्रामीण भागासाठी आणखी प्लॅनिंग करता येईल. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ
शाळा सुरू करायची म्हटली तर..
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच आहेत. त्या आता सुरू करायच्या म्हटल्या तर वर्गखोल्यांच्या साफसफाईसह अनेक कामे करावी लागतील. याबाबत शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, शाळांच्या मागणीप्रमाणे मान्सनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी १० लाखांचा निधी ठेवलेला आहे. ज्या शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या, त्यांची ग्रामपंचायतीमार्फत सफाई, निर्जंतुकीकरण केले जाईल. शाळा स्तरावर पटसंख्येनुसार १० टक्के निधी असतो, त्यातूनही शाळेच्या स्वच्छतेची कामे करता येतील.
सर्वच गुरुजींची शाळा सुरू होणार...?- जिल्ह्यात सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाकडून शाळांना नवीन शैक्षणिक वर्षाबाबत तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत तर ऑनलाइन अभ्यासक्रम उपक्रम राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.