यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांच्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला. त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेऊन राजकीय जीवदान देण्याचा निर्णय झाल्याचे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले. आमदार माणिकराव ठाकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट कायम असून नाराजांची समजूत काढण्यात आली. कासावार यांना जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वामनराव कासावार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून दुसऱ्या फळीतील १६ नेत्यांनी उघड बंड पुकारले होते. त्यानंतर कासावारांनी आपला राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर मी किंवा माझा मुलगा विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या फळीच्या या नेत्यांमध्ये फूट पडली. जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनीच कासावार कायम रहावे म्हणून प्रयत्न चालविले, त्यासाठी नाराज पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविली गेली. परंतु त्यापैकी शंकर बडे, संतोष बोरेले, डॉ. रामचरण चव्हाण, वसंत राठोड, बाळासाहेब मांगुळकर, विवेक दौलतकर, कृष्णा कडू या सदस्यांनी स्वाक्षरी केली. इतरांनी मात्र स्वाक्षरीस नकार देऊन कासावारांच्या जिल्हाध्यक्ष पदाला विरोध असल्याची भूमिका कायम ठेवली. कासावारांनी राजीनामा दिला असलातरी त्यांनी तो मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याऐवजी थेट सोनिया गांधीकडे पाठविल्यानेच आश्चर्य व्यक्त केले गेले. तेथूनच या राजीनाम्यामागे राजकीय नाट्य असल्याची शंका येऊ लागली होती. त्यानंतरच्या घडामोडींनी या शंकेला बळ मिळाले. कासावारांच्या बंगल्यावरून आणि त्यांच्या समक्षच सात नाराज पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस आमदारांच्या सह्या असलेले निवेदन दिल्लीला पाठविले गेले. मुंबईतील बैठकीत राजीनामा मंजुरीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात टोलविला गेला. अखेर अपेक्षेनुसार कासावारांना कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन या राजीनामा नाट्यावर पडदा टाकला गेला. स्वाक्षऱ्या न करणाऱ्या नऊ पदाधिकाऱ्यांपैकी काहींशी चर्चा केली असता ‘आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी आठ दिवसात योग्य निर्णय घेतो’ असा शब्द दिला होता. ही मुदत संपायची आहे. त्यानंतर आम्ही पुढील भूमिका ठरवू मात्र कासावारांच्या जिल्हाध्यक्षपदाला विरोध आणि आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊ नये, या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
राजीनामा नाट्यावर अखेर पडदा
By admin | Published: July 12, 2014 1:45 AM