लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील धनोडा येथे पुलावरून बुधवारी रात्री पैनगंगेच्या पात्रात उडी घेतल्याचा संशय असलेले तरुण आणि तरुणी नात्याने दीर-भावजय असल्याची माहिती पुढे आली. पुलाच्या लोखंडी कठड्याला एक बॅग व पर्स अडकून होती. त्यात तरुणाचे आधारकार्ड आहे. बॅगमध्ये पासपोर्ट फोटोसह बिस्कीट पुडा व नास्त्याचे अन्य साहित्य सापडले होते. पुलावर दोघांच्याही चप्पल आढळून आल्या. आधार कार्डवर तरुणाचे नाव हेमंत राजेंद्र चिंचोलकर (३१), तर महिलेचे नाव सोनाली संदीप चिंचोलकर असून दोघांचाही शोध सुरू असल्याची माहिती गुरुवारी माहूर पोलिसांनी दिली.हेमंत हा सोनालीचा चुलत दीर आहे. हेमंत अविवाहित असून सोनालीचा १५ वर्षांपूर्वी हेमंतचा चुलत भाऊ संदीप चिंचोलकर यांच्याशी विवाह झाला. चालबर्डी, ता. भद्रावती हे सोनालीचे माहेर आहे. १ ऑगस्टला सोनाली चुलत दिरासोबत घरून निघून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी माहूर पोलिसांना दिली. सोनालीच्या भावाने भद्रावती पोलिसांकडे तेव्हाच मिसिंगची तक्रार दिल्याची माहिती आहे.सोनालीला अनुक्रमे ९ आणि १३ वर्ष वयाच्या दोन मुली असल्याची माहिती आहे. एक महिन्यापासून कुटुंबीय या दोघांचा शोध घेत आहेत. हेमंत आणि सोनाली बुधवारी सायंकाळी बसने धनोडा येथे आले. त्यांनी या ठिकाणी तब्बल २ तास घालवले. नंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची बॅग, पर्स आणि चप्पल पुलाजवळ आढळल्या. या दोघांनी पैनगंगेत उडी घेऊन जीवाचे बरेवाईट केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
माहूर पोलीस दोघांच्याही शोधात - हेमंत राजेंद्र चिंचोळकर व सोनाली संदीप चिंचोलकर हे नात्याने दीर व भावजय आहे. १ सप्टेंबर रोजी माहूर हद्दीतील धनोडा येथील पैनगंगा नदीत उडी घेऊन ते मरण पावले, असा माहूर पोलिसांना संशय आहे. त्यांच्या बॅग्स पैनगंगा नदीच्या शेजारील किनाऱ्यावर आढळून आल्या. हेमंत यांचे काका आणि भाऊ गुरुवारी माहूर पोलीस ठाण्यात येऊन भेटून गेले. शेगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील पोलीस ठाण्यामध्ये त्यांची मिसिंग तक्रार दाखल आहे. अद्याप त्यांचा शोध सुरू आहे. नदीकाठच्या गावांशी संपर्कात असल्याचे माहूरचे ठाणेदार नामदेव रिठे यांनी सांगितले.