विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगर पालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेससह इतर प्रमुख पक्ष निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना जिल्ह्यात शिवसेनेची अवस्था मात्र सक्षम नेतृत्वाअभावी अंधारात चाचपडत असल्यासारखी आहे. खासदार भावना गवळी इडीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत, तर मंत्रिपद गेल्यानंतर संजय राठोड यांनी आपले लक्ष केवळ विधानसभा मतदारसंघापुरते केंद्रित केले आहे. पालकमंत्री जिल्ह्यात मोजकेच दौरे करीत असल्याने दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न शिवसैनिकातूनच केला जात आहे.सात विधानसभा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचा एक गट सांभाळला होता. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार संजय राठोड यांची वनमंत्री म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर जिल्ह्यात भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये नेतृत्वासाठीची स्पर्धा सुरू झाली. नेतृत्वाच्या या संघर्षामुळे का होईना दोघांनीही आपापल्या गटांना बळ देण्यास सुरुवात केली होती; मात्र भावना गवळी या इडीच्या फेऱ्यात अडकल्या, तर संजय राठोड यांची वनमंत्री पदावरून गच्छंती झाली. इडीच्या ससेमिऱ्यामुळे गवळी यांनी यवतमाळकडे पाठ फिरविली. तर इकडे मंत्रीपद गमावलेले राठोड हेही आता केवळ दारव्हा, दिग्रस, नेर पुरते राहिल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक नेतृत्वाअभावी सैरभैर झाल्याचे सध्या चित्र आहे. नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने काॅंग्रेससह इतर पक्षांनी जनसंपर्क वाढविला असून शहरी भागात कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची तयारी गावपातळीवर सुरू झाली असताना शिवसेनेत मात्र गोंधळाची स्थिती आहे. पक्ष राज्याच्या सत्तेतील प्रमुख वाटेकरी असताना जिल्हा शिवसेनेतील हरपलेले चैतन्य पुन्हा आणण्यासाठी राज्य नेतृत्वालाच आता पुढाकार घ्यावा लागणार आहे.
पालकमंत्री असूनही शिवसैनिक निराधार- वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल ६० दिवस यवतमाळचे पालकमंत्रीपद रिक्त होते. अखेर शिवसैनिकांनीच पक्षप्रमुखांची भेट घेऊन याबाबतचे गाऱ्हाणे मांडल्यानंतर रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. जिल्ह्यातील शिवसेनेची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे आव्हान भुमरे यांच्यासमोर आहे; मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील विधानसभेचे सदस्य असलेल्या भुमरे यांचेही जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे जिल्ह्यात साधे संपर्क कार्यालयही नसल्याने पालकमंत्री असूनही निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिक निराधार असल्यासारखी जिल्ह्यात स्थिती आहे.
शिवसैनिकांना कामाला लावायचे कोणी- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात एकमुखी नेतृत्व नसल्याने निवडणुकीच्या तयारीला अद्यापही सेनेत वेग आलेला नाही. पक्षाने विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड आणि पराग पिंगळे अशा तीन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली आहे. तर यवतमाळच्या विधानसभा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी संतोष ढवळे यांच्यावर सोपविली आहे. संघटनात्मक पातळीवर अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असली तरी या पदाधिकाऱ्यांना कामाचे आदेश देणारे नेतृत्वच नसल्याने शिवसैनिक कोंडीत सापडला आहे.
खासदारांची नाराजी आमदारांवर की नगराध्यक्षांवर- जिल्ह्यात एकजुटीने शिवसैनिक कामाला लागण्यासाठी अंतर्गत मतभेद थांबण्याची शिवसैनिकांना प्रतीक्षा आहे. मात्र जिल्हा शिवसेनेत नेतृत्वासाठी कायम रस्सीखेच राहिली आहे. मध्यंतरी खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांचे दोन गट उघडपणे दिसत होते. हा सत्ता संघर्ष अद्यापही कायम असल्याचे नुकतेच दिसून आले. पालिका क्षेत्रात विकासकामांच्या झालेल्या भूमिपूजन सोहळ्यावेळी खासदार गवळी यांच्या नावाचा नामफलकावर उल्लेख नसल्याचा आरोप करीत त्यांच्या समर्थकांनी थेट पक्षप्रमुखांकडे तक्रार केली. गवळी यांची नेमकी नाराजी आमदारांविरोधात आहे की नगराध्यक्षांविरुद्ध, हे अद्यापही उलगडलेले नाही.