लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील एका कुटुंबातील पाच व्यक्ती बेपत्ता आहे. हे कुटुंब उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड येथे आले होते, अशी माहिती आहे. त्यांनी धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. विदर्भ व मराठवाड्यातील चार पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी त्यांचा शोध घेत आहे.उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सहस्रकुंड धबधबा आहे. २८ सप्टेंबरला धबधबा परिसरात एका अज्ञात १३ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. नंतर दराटी पोलीस ठाण्याअंतर्गत पैनगंगा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा नदी पात्रात १ ऑक्टोबरला आणखी एक मृतदेह आढळला. मृताच्या खिशात मोबाईल सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली. हे तिनही मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले.विदर्भ-मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदी पात्रात एकाच कुटुंबातील पाचपैकी तीन व्यक्तींचे मृतदेह आढळले. मृ्तक नांदेड जिल्ह्यातील दहगाव येथील एका नामांकित कुटुंबातील असल्याचे दिसून आले. आता उर्वरित दोन व्यक्तींचा शोध सुरू आहे. त्यासाठी विदर्भातील बिटरगाव व दराटी आणि मराठवाड्यातील इस्लामपूर व हदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तपास करीत आहे. मात्र या चारही पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित घरी जाऊन चौकशी केली वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतदेहांबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या विविध तर्कवितर्क सुरू आहे. त्या कुटुंबातील १४ आणि २० वर्षीय मुली अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा पैनगंगा नदी पात्रात यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन चमू आणि बिटरगाव पोलीस शोध घेत आहे. मात्र अद्याप शोध लागला नाही, अशी माहिती बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी दिली.नांदेड पोलीस अधीक्षकांची सहस्त्रकुंडला भेटमृतक नांदेड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी २ ऑक्टोबरला सहस्रकुंड येथे भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी केली. इस्लामपूरचे ठाणेदार सुशांत किनगे यांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मात्र मृतक आणि बेपत्ता व्यक्तींबाबतचे गूढ कायम आहे.
सहस्त्रकुंड धबधबा परिसरात ‘त्या’ कुटुंबांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:00 AM