९९ उमेदवार : गुरूवारी होणार फैसला, ग्रामीण भागात निकालाची उत्सुकता यवतमाळ : जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी मंगळवारी ७२.८६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा गुरूवारी फैसला होईल. दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी मारेगाव तालुक्यातील कुंभा-मार्डी, वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, आर्णीतील देऊरवाडी-सुकळी, नेरमधील वटफळी-अडगाव, दारव्हातील लाडखेड-वडगाव आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी गटांसह १२ गणांसाठी मतदान घेण्यात आले. या सहा गटांमध्ये ३४ उमेदवार रिंगणात होते. पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ६५ उमेदवार होते. या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. कुंभा-मार्डी गटात ७५.५७ टक्के, वटफळी-अडगाव ७०.०६, लाडखेड-वडगाव ७०.१५, घोन्सा-कायर ७६.३४, विडूळ-चातारी ७३.९४ आणि देऊरवाडी-सुकळी गटात ६९.९२ टक्के मतदान झाले. मतदानासाठी १७९ केंद्र होते. सर्व केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदार पार पडले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५५ गट व पंचायत समितीच्या ११० गणांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले होते. यात जिल्हा परिषदेसाठी ३१५ तर पंचायत समितीसाठी ५९६ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट राज्यस्तरीय नेत्यांना जिल्ह्यात पाचारण करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्याही जिल्ह्यात प्रचारसभा झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात सरासरी ६३ टक्के मतदान झाले होते. आता पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची गुरूवार, २३ फेब्रुवारीला सर्व तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत उमेदवार आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये निकालाची उत्सुकता कायम राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)
दुसऱ्या टप्प्यात ७२ टक्के
By admin | Published: February 22, 2017 1:12 AM