सहा वर्षानंतरही शोध सुरूच : अधिकारी आणि शिक्षकांचे एकमेकांकडे बोट वणी : वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या भालर वसाहतीतील जिल्हा परिषद शाळेतील रेकॉर्ड गहाळ होण्याचे रहस्य सहा वर्षानंतरही गुलदस्त्यात आहे. या रेकॉर्डचा आता पुन्हा एकदा नव्याने शोध घेतला जात आहे. मात्र रेकॉर्ड ठेवलेली आलमारी पुन्हा सापडेल की नाही, याची कोणतीच खात्री नाही. अतिशय गंभीर असलेल्या या प्रकरणात शिक्षक आणि पंचायत समितीतील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. अलिकडे कॉन्व्हेंट संस्कृती फोफावल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या रोडावली आहे. परिणामी भालर येथील जिल्हा परिषद शाळा सन २०१० मध्ये जिल्हा परिषद प्रशासनाला बंद करावी लागली. या शाळेत एक ते चार वर्गापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळा सुरू असताना या ठिकाणी देवेंद्र राजुरकर व मनोहर कहालकर असे दोन शिक्षक कार्यरत होते. ही शाळा बंद झाल्यानंतर देवेंद्र राजुरकर यांचे निवली येथे तर मनोहर कहालकर यांचे गणेशपूर जिल्हा परिषद शाळेत समायोजन करण्यात आली. भालर वसाहतीतील शाळा कुलूपबंद करण्यात आली. मात्र या शाळेचे रेकॉर्ड काळजीपूर्वक जपून ठेवण्याची गरज ना शिक्षकांना, ना अधिकाऱ्यांना वाटली. जेव्हा या सगळ्या प्रकाराच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी झाल्या, तेव्हा अधिकारी खडबडून जागे झाले. रेकॉर्डची शोधा-शोध सुरू झाली. मात्र रेकॉर्डचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान, हे प्रकरण विधानसभेतही पोहचले. त्यावर चर्चाही झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. केवळ तत्कालिन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने रेकॉर्ड ठेवलेली आलेली आलमारी शाळेतून बेपत्ता झाली असली तरी अद्यापही हा विषय कुणीही गांभिर्याने घेतला नाही किंवा कुणावरही कारवाई करण्यात आली नसल्याने कमालिचे आश्चर्य व्यक्त होत आहे. घडलेला प्रकार अतिशय गंभीर असताना या प्रकारावर पांघरून घालण्याचाच प्रकार आजवर होत आल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
शाळेतील रेकॉर्डचे रहस्य गुलदस्त्यात
By admin | Published: July 21, 2016 12:26 AM