महिलेची तक्रार : २० हजारांचे पीक कर्ज, व्याजासह ६० हजारदिग्रस : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मंजूर शैक्षणिक कर्जाची उचल वारंवार मागणी करूनही नियमितपणे न देता सातत्याने अवहेलना करण्यात आली. त्यामुळे पाल्याचे शैक्षणिक नुकसान झाले. एवढेच नाही तर पीक कर्जाची आगाऊ आकारणी कोणतीही पूर्व सूचना न देता केली. एवढेच नाही तर नियमबाह्य पद्धतीने थेट जप्तीची कारवाई करण्यात आल्याची तक्रार दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील एका महिला शेतकऱ्याने वरिष्ठांकडे केली आहे. तालुक्यातील डेहणी येथील ज्योती रामेश्वर जाजडा व ओमप्रकाश जाजडा यांची शेती आहे. ज्योती जाजडा यांंनी आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणाकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कलगाव शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला. सदर अर्ज मंजूर झाला. परंतु मंजूर असलेल्या कर्जाच्या हप्त्याची उचल करताना बँकेचे धोरण व जाचक अटींचा सामना त्यांना करावा लागला. वेळेत कर्ज पुरवठा केला नाही. उलट कर्ज वाटप बंद आहे, असे त्यांना सांगण्यात आले. यामुळे त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. या उलट बेजबाबदारपणे केवळ २० हजारांचे पीक कर्ज तब्बल ५० हजार रुपये मुद्दल व दहा हजार २६६ रुपये व्याज असे ६० हजार २६६ रुपये आकारले. कोणतीही पूर्व सूचना न देता स्थानिक प्रशासनाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. तशी नोंद सातबाऱ्यावर करण्यात आली. सातबाऱ्यावरील अवाजवी बोजा नोंद व जप्तीच्या कार्यवाहीमुळे शिक्षणासह इतर आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून इतर बँकांकडे जाण्याचा हक्कही हिरावून घेतल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. गत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असताना केलेली जप्तीची कारवाई अन्यायकारक असून अवास्तव बोजा त्वरित हटवून शेतावरील जप्तीची कारवाई थांबवावी, अशी मागणी ज्योती रामेश्वर जाजडा व ओमप्रकाश जाजडा यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
शैक्षणिक कर्ज न देता पीक कर्जासाठी जप्ती
By admin | Published: November 14, 2015 2:44 AM