शेंबाळपिंपरी (यवतमाळ) : पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील प्रमोद दशरथ पानपट्टे यांनी गावातील पाणी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रमोद पानपट्टे यांनी पाणी समस्या घेऊन यापूर्वी इतर तीन गावकऱ्यांसोबत ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले होते. त्यांचे उपोषण समस्या निकाली काढण्याची ग्वाही देऊन सोेडविण्यात आले होते. तहसीलदारांनी त्यांना हे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप गावातील पाणी समस्या सुटली नाही. पाण्यासाठी दोनदा मोर्चा काढण्यात आला. तरीही पाणी समस्या काही भागात कायम आहे.
बुधवारी सायंकाळी प्रमोद पानपट्टे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासोबत पाणी का सोडत नाही, यावरून वाद घातला. त्यानंतर जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना फोनवरून जनतेला पाणी व्यवस्थित मिळत नसल्यामुळे आत्महत्या करतो, असे सांगितले. लगेच त्यांनी बसस्थानक परिसरात हातात डिझेलची बाटली घेऊन अंगावर ओतली. आगपेटीने काडी लावत असतानाच काही ग्रामस्थ व खंडाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे ओले कपडे, आगपेटी आणि डिझेल बाटली असे साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.