राजेश निस्ताने
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अद्याप कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी सर्वच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित जुळते की नाही याबाबत साशंकता आहे. सध्यातरी सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर नगरपंचायत निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे.
जिल्ह्यातील झरीजामणी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि महागाव या सहा नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सध्या मतदार याद्यांवर हरकती व सूचना मागण्यात आल्या आहे. लवकरच या निवडणुकीचा कार्यक्रम जारी होणार आहे. या नगरपंचायत क्षेत्रातील राजकीय इच्छुकांनी जोरात तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक आघाडीत होणार की स्वबळावर लढणार याबाबत इच्छुकांमध्ये साशंकतेचे वातावरण पहायला मिळते. भाजप स्वबळावर लढणार हे जवळजवळ निश्चीत आहे. कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे गणित नगरपंचायतीत जुळते का हे पाहणे महत्वाचे ठरते. या मुद्यावर तीनही प्रमुख पक्षात सध्या कोणतीच चर्चा नाही. सर्वच पक्ष शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत व्यस्त आहेत.
ज्या सहा नगरपंचायत क्षेत्रात ही निवडणूक होऊ घातली आहे, तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद नसल्याचा शिवसेनेतील सूर आहे. या नगरपंचायतीला जोडून असलेल्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद असेल मात्र शहरात नाही, असा ठाम दावा सेनेकडून केला जात आहे. तरीही एक-दोन जागा देऊन राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची सेनेची तयारी दिसते. नगरपंचायत क्षेत्रात भाजप, कॉंग्रेस व शिवसेना या तीनच प्रमुख पक्षांची ताकद असल्याचे मानले जाते. ते पाहता बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती पहायला मिळतील, असा अंदाज आहे. सर्वच प्रमुख पक्ष अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देऊन सांभाळण्याच्या दृष्टीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे.
भाजप आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नगरपंचायत निवडणूक होऊ घातलेल्या सहा नगरपंचायतींचे क्षेत्र हे भाजपच्या अनुक्रमे संजीवरेड्डी बोदकुरवार, प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि नामदेव ससाने या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे या पंचायत निवडणुकीत या आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यात कुण्या आमदाराला किती यश मिळते हे वेळच सांगेल.
सध्या आम्ही शिक्षक मतदारसंघात व्यस्त आहोत. नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडीत लढायची की स्वतंत्र याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
- आमदार डॉ. वजाहत मिर्झा,
अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेस कमिटी, यवतमाळ.
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी ठेवायची का याबाबत वरच्या स्तरावर अद्याप कोणताही निर्णय नाही. जिल्हास्तरावर नेत्यांमध्ये याबाबत एकमत होते का हे महत्वाचे आहे. नगरपंचायत क्षेत्रात पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आहेच. जेथे नसेल तेथे ती आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
- ख्वाजा बेग,
अध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस, यवतमाळ
कार्यकर्त्यांना सांभाळायचे असल्याने नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह राहील. तेथे महाविकास आघाडी होणे कठीण दिसते. मात्र बहुतांश ठिकाणी शिवसेना, कॉंग्रेस व भाजप या तीन पक्षात लढती होतील, असे चित्र आहे.
- पराग पिंगळे,
जिल्हा प्रमुख, शिवसेना, यवतमाळ.