लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तालुक्यातील कोच्ची येथे कोरोना विषाणूला हरविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली असून गाव समितीने लॉकडाऊनच्या काळात सर्व सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना कुठल्याही कामासाठी गावाबाहेर जावे लागणार नाही याची तरतूद झाली आहे.गावकऱ्यांनी गाव समितीची स्थापना करुन त्याव्दारे विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. दवाखान्यात जाणे आवश्यक असल्यास पोलीस पाटील सुमित अक्कलवार, सरपंच पंकज अक्कलवार यांच्या परवानगीशिवाय किंवा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणीही बाहेर जात नाही. गावकऱ्यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक समितीसुद्धा स्थापन केली. गावात विषाणूचा कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावातच भाजीपाल्याची व्यवस्था, किराणा उपलब्ध करून दिला. गावात वेळोवेळी फवारणी करणे, नाल्या उपसणे, काही विशेष लाभार्थ्यांना तेल, डाळ, मास्क, तांदूळ, सॅनिटाईझर, साबण देण्यात आले. गावात विलगीकरण कक्षाची सोय केली. आतील रस्तावर सूचना फलक लावले. परवानगी म्हणून पासची व्यवस्था केली.अत्यावश्यक कामासाठी तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका व शिपाई यांचे मनोबल वाढावे म्हणून त्यांना ग्रामपंचायत निधीतून प्रत्येकी एक हजार रुपये दिले. परवानगीशिवाय बाहेर जाणाऱ्यांना दंड आकारला जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आठवड्यातून एक दिवस मार्गदर्शन करतात. लॉऊडस्पिकरच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. आशा, अंगणवाडी सेविका, डॉक्टर घरोघरी जाऊन आरोग्याबाबत विचारणा करतात.
बाहेरून आलेल्यांची खास नोंदगावात नवीन व्यक्ती आल्यास त्याला तपासणीसाठी पाठवून नोंद घेतली जाते. या संकटात गरीबंना उपजीविका भागविता यावी म्हणून त्यांना नाली उपसा, परिसर स्वच्छता, भाजीपाला विक्रीच्या माध्यमातून रोजगार दिला. या उपक्रमात समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, गावकरी सहकार्य करीत आहे.