यवतमाळ : वंचितांना प्रतिनिधित्व, सामाजिक भागीदारीसाठी आमची लढाई आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला. आम्ही हे होऊ देणार नाही, हा देश आमच्याही हिश्शाचा आहे. त्याला आम्ही बर्बाद करू देणार नाही, देश वाचविण्याची क्षमता केवळ संविधानात आहे, त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी एकत्रित येऊ या, असे आवाहनही त्यांनी केले.
महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समतापर्व प्रतिष्ठानच्या वतीने समता मैदानावर आयोजित ‘राष्ट्र निर्माते डाॅ. आंबेडकर यांचे संविधान आणि आजची लोकशाही’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सत्तेत आल्यापासून देशातील ऐतिहासिक संस्था विक्रीला काढल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली जात आहे. सार्वजनिक दवाखाने, शासकीय शाळा-महाविद्यालये गुंडाळण्यात येत आहे. या संस्था बंद झाल्या तर कोणाची मुले शिक्षणापासून वंचित राहतील?, कोणत्या घटकाला आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागेल याचा विचार करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून आज कष्टकऱ्यांना संपविले जात आहे. एअर इंडियाच भारत सरकारकडे नसेल तर हवाई वाहतूक मंत्री काय करणार, शासकीय शाळा, महाविद्यालये उरणार नसतील तर शिक्षण मंत्र्याला काय अर्थ राहील, शासनाची रेल्वेच नसेल तर रेल्वेमंत्री काय कामाचे, देशातील सर्व काही विकून आत्मनिर्भरतेचा धडा पंतप्रधान देत आहेत, सरकारी संस्था खासगी लोकांच्या घशात घालणार असाल तर सरकारी पंतप्रधान तरी कशाला असा परखड सवालही कन्हैयाकुमार यांनी केला.
वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन इलेक्शन मग पेट्रोल, डिझेलवर वन टॅक्स का नाही, जीएसटी महत्त्वाची आहे तर इंधनावर जीएसटी का नाही असा प्रश्नांचा भडीमार करीत हे स्वातंत्र्य आम्हाला गिफ्ट म्हणून मिळालेले नाही, यासाठी आमच्या अनेकांनी जीव गमावलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य राखण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचे सांगत त्यासाठी संविधान वाचवावे लागेल, त्यासाठी एकजूट महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी प्रा. डाॅ. प्रवीण इंगोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोदिनी रामटेके होत्या. अॅड. रामदास राऊत, सत्यवान देठे यांनी कन्हैयाकुमार यांचे स्वागत केले. अॅड. जयसिंह चव्हाण यांनी परिचय, अॅड. इम्रान देशमुख यांनी संचालन तर जयश्री भगत यांनी आभार मानले.
मूळ समस्यांकडून लक्ष हटविण्यासाठी विद्वेष
मागील ४५ वर्षातील सर्वोच्च स्तरावर बेरोजगारी पोहाेचली आहे. महागाई दरात ३०० पटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे विविध सरकारी सेवेतील नोकर भरती बंद आहे. पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाट वाढले आहे. या मूळ समस्यांकडे लक्ष जाऊ नये यासाठी देशात विद्वेषाची पेरणी केली जात असल्याचा आरोपही कन्हैयाकुमार यांनी केला. जे शिक्षक महागाईसारख्या मूलभूत विषयावर बोलतात, त्यांना देशद्रोही ठरविले जात असून देश विकणारेच देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली.