राज्यात सर्वाधिक एक लाख मतांची आघाडी घेऊन विजयी होण्याचे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवत चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांच्यापुढे भाजपचे बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड, संजय देशमुख आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे मो. तारिक मो. शमी (लोखंडवाला) यांच्यात तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत. येथे १० उमेदवार रिंगणात आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे बंडखोर संजय देशमुख रिंगणात उतरले आहे. यापूर्वी ते अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी व त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असे समीकरण संजय देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापुढे मांडले होते. मात्र घड्याळ हाताला बांधण्याचा आग्रह असल्याने हा प्रस्ताव बारगळला. राष्ट्रवादीने तेथे नवा चेहरा म्हणून तारिक लोखंडवाला यांना उमेदवारी दिली. ते मतदारसंघातील अल्पसंख्यक व राष्ट्रवादी तसेच आघाडीची मते आपल्याकडे खेचण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरते. भाजप बंडखोर संजय देशमुख मतदारांच्या सर्वच गटात ‘वाटेकरी’ बनतील असा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणातून अप्रत्यक्षपणे देशमुखांच्या उमेदवारीवर आसूड ओढले असले तरी प्रभावी अपक्ष म्हणूनही त्यांच्याकडे मुंबईतून सहानुभूतीने पाहिले जात असल्याचे सांगितले जाते. लोकसभेत भाजपला पोषक असलेले वातावरण विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत नाही. काठावरचे संख्याबळ मिळाल्यास सत्ता स्थापनेसाठी अपक्ष निर्णायक भूमिका वठवू शकतात. अशा वेळी युतीला आणि विशेषत: भाजपला पोषक असलेल्या अपक्षांना दुखवू नये, असा वरच्या स्तरावरील छुपा अजेंडा असल्याचेही बोलले जाते.बालेकिल्ल्यात शिवसेना चौथ्यांदा विजयी होणार असा दावा राठोड समर्थक करीत आहे. त्यांनी सामूहिक लाभाऐवजी वैयक्तिक लाभाच्या योजनांवर दिलेला भर, त्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न, आरोग्य सेवा, शिबिरे या संजय राठोड यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. दिग्रस, दारव्हा, नेर या तीनही तालुक्यात शिवसेनेचे असलेले नेटवर्क, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता, सहकारावरील वर्चस्व या बळावर शिवसेना आपली जागा कायम राखेल असे मानले जाते. आतापर्यंत एकतर्फी वाटणारी लढाई शिवसेनेसाठी मात्र भाजप बंडखोर संजय देशमुख यांच्या उमेदवारीने चांगलीच अटीतटीची बनली आहे. राष्ट्रवादीचे लोखंडवाला तेथे भाजप बंडखोरासाठी मतविभाजनामुळे डोकेदुखी ठरू शकतात. देशमुख व लोखंडवाला हे शिवसेनेची मतांची आघाडी कितीने कमी करतात याकडेच संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने येथे अॅड. शहेजाद शम्मीउल्ला खॉ यांना उमेदवारी दिली आहे.
सेना व भाजप बंडखोरात ‘काटे की टक्कर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM
शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी व त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असे समीकरण संजय देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापुढे मांडले होते. मात्र घड्याळ हाताला बांधण्याचा आग्रह असल्याने हा प्रस्ताव बारगळला. राष्ट्रवादीने तेथे नवा चेहरा म्हणून तारिक लोखंडवाला यांना उमेदवारी दिली.
ठळक मुद्देलक्षवेधी लढत : राष्ट्रवादी काँग्रेसही लढतीत, ‘सीएम’च्या सभेने ‘बुस्ट’