- रविंद्र चांदेकर
उमरखेड (यवतमाळ) : जिल्ह्यातील उमरखेड हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघातून दरवेळी नव्या चेह-याला संधी दिली जाते.मराठवाडा सीमेवरील उमरखेड मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. १९६२ पासून आतापर्यंत या मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा कोणताही आमदार विजयी झाला नाही. तथापि काँग्रेसचे एक वकील उमेदवार या मतदार संघातून दोनदा विजयी झाले होते. मात्र ते सुद्धा सलग निवडणुकीत विजयी झाले नाही. शिवसेनेच्या इच्छुकांनी गेल्या काही वर्षापासून मतदार संघात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र गेल्या पाच वर्षात गलितगात्र झाल्याचे दिसून येत आहे.भाजप-शिवसेनेची युती झाल्यास हा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या आघाडीत हा मतदार काँग्रेसकडे आहे. युती आणि आघाडीकडून अनेक चेहरे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. विशेष म्हणजे मतदार संघाच्या बाहेरील काही इच्छुकांनीही गेल्या अनेक महिन्यापासून उमरखेड-महागावमध्ये डेरा टाकला आहे. उमेदवारीवर त्यांचाही डोळा आहे. युती आणि आघाडीच्या उमेदवारीसाठी मतदार संघाबाहेरील काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी फिल्डींग लावून बसले आहे.लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाने शिवसेना उमेदवाराला तब्बल ५० हजारांच्यावर लिड दिला. त्यामुळे आता भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघावर शिवसेनेने दावा ठोकला आहे. यामुळे विद्यमान आमदारांसमोर सेनेतून आव्हान निर्माण झाले आहे. संघाने थेट कळंब मधील एका पदाधिका-याला गेल्या काही महिन्यांपासून उमरखेड मतदार संघात पाठविले आहे. वरिष्ठांकडून त्यांना ‘बुस्ट’ दिले जात आहे. यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसमध्येही बाहेरील इच्छुकांनी दावा ठोकल्याने मतदार संघातील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे. युती आणि आघाडीचे घोडे गंगेत न्हाल्यास थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र युतीत अखेरच्या क्षणी बंडखोरी होण्याची दाट शक्यताही कायम आहे.जिल्हाध्यक्षांची भूमिका निर्णायकविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अचानक जिल्हाध्यक्ष बदलविला. उमरखेडकडे अध्यक्षपद सोपविले. यामुळे उमरखेड विधानसभा मतदार संघात भाजप जिल्हाध्यक्षांची भूमिका उमेदवारी देताना निर्णायक ठरणार आहे.