बँकिंग सेवा वारंवार होतेय ठप्प
पांढरकवडा : शहरातील तसेच ग्रामीण भागातील काही बँका लिंक नसल्याचे कारण सांगत असल्याने व्यवहारासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येकांना व्यवहार न करताच परतावे लागत असल्याचेही चित्र आहे. यामुळे ग्राहकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
दूध भेसळच्या प्रमाणात झाली वाढ
पांढरकवडा : दुधात भेसळ करून अनेक पदार्थ विक्री करण्याचा शहरात सपाटा सुरू असून असे पदार्थ ग्रामीण भागातील नागरिकाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन
योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
मोघे विद्यालयात टिळक जयंती
मारेगाव : तालुक्यातील जळका येथील लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश नहाते, व्यवस्थापक अतुल मोघे, विना बोढे, बाळासाहेब मानकर, सुनील आसेकर, डी.एम.पोल्हे आदी उपस्थित होते.
घोन्सा येथे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात वृक्षारोपण
घोन्सा : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मुख्याध्यापक रमेश बोबडे यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य महेश उराडे, माजी मुख्याध्यापक मोहन उपरे, सरपंच मंगेश मोहुर्ले, तिरंजीत सुरपाम, ग्रामविकास अधिकारी नागरगोजे व गावातील नागरिक तथा महिला उपस्थित होत्या. यावेळी परिसरात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.