बँकिंग सेवा होतेय वारंवार ठप्प
पांढरकवडा : शहरातील तसेच ग्रामीण भागातील काही बँका लिंक नसल्याचे कारण सांगत असल्याने व्यवहारासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येकांना व्यवहार न करताच परतावे लागत असल्याचेही चित्र आहे. बँकिंग सेवा वारंवार ठप्प होत असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँकेने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
दूध भेसळीत झाली प्रचंड वाढ
पांढरकवडा : दुधात भेसळ करून अनेक पदार्थ विक्री करण्याचा शहरात सपाटा सुरू असून असे पदार्थ ग्रामीण भागातील नागरिकाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अशांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असून नेमका याच गोष्टीचा फायदा घेत तालुक्यात असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येते.
किडीच्या प्रादुर्भावामुळे ओढावले संकट
पांढरकवडा : तालुक्यात पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. किडीच्या प्रादुर्भावमुळे शेतकऱ्यांवर संकट दिसून येत आहे. या किडीला रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर विविध प्रकारचे किटकनाशके फवारली जात आहे. मात्र तरीही कीड आटोक्यात येत नसून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता कृषी विभागानेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
वणीतील जैन लेआऊट परिसरात चोरी
वणी : शहरातील जैन लेआऊट परिसरातील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह सहा हजार रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. जैन लेआऊट परिसरातील जगदीश चंद्रभान पातूरकर हे काही कामानिमित्त बाहेरगावला गेले होते. याचदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्याची माळ, कानातील दागिने, जिवती व नगदी सहा हजार रुपये, असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शनिवारी पातूरकर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कॅप्शन : पुलावर अडकला पुरातील काडीकचरा
राष्ट्रीय महामार्ग ४४ ला जोडणाऱ्या कवठा (वारा) दरम्यान असलेल्या पुलावर पुरामध्ये वाहून आलेला कचरा असा गोळा झाला आहे. यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (छाया : नीलेश यमसनवार, पाटणबोरी)