घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे शिक्षण सोडून भौतिक सुखाची स्वप्न रंगविणाऱ्या तरुणाच्या टोळक्याने अट्टल गुन्हेगाराला लाजवेल अशा पद्धतीने फुलसावंगीत सशस्त्र धुमाकूळ घातला. सिनेस्टाईल पद्धतीने फोनवरून गावातील नामांकित व्यापाऱ्यांना धमकावले. पैसे न दिल्यास इंगा दाखविणार असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास संपूर्ण गावादेखत अक्षरश: बाजारपेठेतील दुकानांमध्ये जावून पैशासाठी धमकवण्यात आले. इतकेच नव्हेतर गोडावूनमधून सर्वांच्या देखत नऊ लाखाची रोकड या टोळक्याने लंपास केली. गुन्ह्याची ही पद्धत पाहून पोलीस दलाचीही पाचावर धारणा बसली. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडवून दिली. महागाव या दुर्गम तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ ही फुलसावंगीत आहे. माळरानावर वसलेल्या आडवळणावरच्या गावातील नागरिकांचा संपूर्ण व्यवहार हा फुलसावंगीशी जुळलेला आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ तालुक्याच्या ठिकाणापेक्षाही अतिशय सक्षम असून दिवसाची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. यातूनच गावातील गुन्हेगारीही वाढली आहे. सातत्याने या गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हेगारी प्रवृत्तीकडून झाला आहे. कधीकाळी बाबर टोळीची येथे चांगलीच दहशत होती. याचाच पगडा येथील अल्पवयीन काही तरुणांमध्ये दिसून येतो. यातूनच २६ फेब्रुवारीला थेट फोनवरून खंडणी मागण्याचा प्रकार घडला. घरी आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबातील टारगट मुलांनी एकत्र येऊन हा खंडणीचा प्लान आखला. सिनेमाच्या गुन्हेगारी विश्वाला भारावलेल्या शेख शाहरूख ऊर्फ टप्पू शेख निजाम (२३) रा.फुलसावंगी याने गावातील धनदांडग्या व्यापाऱ्याला फोनवरून हप्ता मागितला. ‘तेरा बडा दुकान है, मार्केट भी अच्छा चलता है, यहा धंदा करना होगा तो हप्ता देना पडेगा’ अशा स्टाईलने धमकावले. या फोनमुळे व्यापारी संदेश मुत्तेपवार गोंधळात पडले. त्यांनी या टप्प्याला उलटपक्षी कशाचे पैसे म्हणून धुडकावून लावले. ही बाब टप्प्या व त्याच्या साथीदार असलेल्या मजहर खान नूर खान (२०) रा.फुलसावंगी, शेख मोबीन शेख इस्त्राईल (२७) रा.चमेडियानगर, यवतमाळ यांना खटकली. त्यावरून दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळी या आरोपींनी व्यापारी संदेश मुत्तेपवार यांना गाठले. यावेळी पवार यांच्यासोबत त्यांचा मित्र मदन पांडे हा होता. कशाचे पैसे द्यायचे यावरून वाद झाला. आरोपी शाहरूखने जवळ असलेल्या सत्तुराने मदन पांडे यांच्या हातावर वार केला. त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली. तसेच छातीवरही ओझरता घाव बसला. या घटनेनंतर परिसरात नागरिक जमा झाल्याने आरोपींनी पळ काढला, तर जखमी मदन पांडेला घेवून संदेश मुत्तेपवार हे गावातील दवाखान्यात पोहचले. तिथे गेल्यानंतर काही वेळातच तिघेजण बाजारपेठेतील कृषी केंद्रात तोडफोड करत असल्याची माहिती संदेश मुत्तेपवार यांच्या भावाने दिली. आरोपींनी कृषी केंद्रातील तोडफोड केल्यानंतर गोडावूनकडे मोर्चा वळविला. तिथे एक विधिसंघर्षग्रस्त बालक आरोपींसोबत होता. या चौघांनी दिवाणजीच्या गळ्यावर चाकू लावून आठ लाख ७५ हजारांची रोकड लंपास केली. तिथेही शिवीगाळ करून धमकावून चारही आरोपी एकाच दुचाकीने पळून गेले. या घटनेने फुलसावंगीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस दलातही धावपळ सुरू झाली. भरदिवसा गावातील बाजारपेठेत खंडणीवरून धुमाकूळ घालण्यात आला. यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले. तातडीने जिल्हा मुख्यालयातून सूत्रे हालली. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत अटक करा, असा आदेश आला. फुलसावंगी तील दोघांचे चेहरे परिसरात सर्वांच्याच ओळखीचे होते. अशातच आरोपी निंगनूर शिवारात पुलाखाली दडून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून ठाणेदार करीम बेग मिर्झा यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने आरोपी शेख मोबीन याला अटक केली. नंतर मुख्य सूत्रधार शाहरूख ऊर्फ टप्प्याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार हस्तगत केले. दिग्रस येथून मजहर खान याला अटक केली. या चारही आरोपींकडून तीन लाखाची रोख प्राप्त केली. आता यातील तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर विधिसंघर्षग्रस्त बालकाला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या कारवाईत महागाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत विश्वास पावरा, प्रशांत स्थूल, सुनील पंडागळे, युवराज जाधव यांनी सहभाग घेतला.
फुलसावंगीत सिनेस्टाईल खंडणी मागणाऱ्या ‘टप्प्या’चा बंदोबस्त
By admin | Published: March 19, 2017 1:25 AM