के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.प्रा.वसंतराव पुरके विधानसभा उपाध्यक्ष असताना १९ नोव्हेंबर २०१३ रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयाने सहा कोटी ९५ लाख रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली. आवश्यक ती लोकवर्गणी जुळवून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली. योजना मंजुरीच्या वेळी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. १ मार्च २०१४ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली. २०१५ अखेर नगरपंचायतीवर निर्वाचित प्रतिनिधी आले. मात्र गेल्या साडेचार वर्षात योजनेची गती मंदावली आहे.यावर्षी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र वाढीव पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्णत्वास गेली नाही. यामुळे शहरातील १७ प्रभागात नियमित पाणी पुरवठा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून संताप वाढत आहे. दोन- अडीच वर्षात योजना पूर्णत्वास जाणे अपेक्षित असताना विलंब लागल्याने आता अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहे. योजनेच्या खर्चात वाढ झाली. शहराचा भौगोलिक विस्तार झाला. त्यात अनेक ठिकाणची पाईपलाईन छोट्या आकाराची असल्याने सध्या अनेक भागात पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे.जुनी नळ योजना ६० टक्के शहरालाच पाणी पुरवठा करू शकत होती. आता वाढीव पाणीपुरवठा योजा क्रियान्वित करताना अनेक अडचणी येत असल्याने कधी कोठे जुन्या, तर कधी कोठे नव्या नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दुसरीकडे शहरातील खासगी, सार्वजनिक हातपंप, विहिरी आटल्याने नागरिक संकटात सापडले आहे. अनेकांनी केवळ पाण्यासाठी जुना व चालू कर, पाणी कर, नळ कनेक्शन शुल्क, जोडणी शुल्काचा खर्च केला. मात्र त्यांना चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा आहे.दुसरीकडे प्रत्येक मार्गावर पाईप टाकण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या. नळ कनेक्शनसाठी रस्ते फोडण्यात आले. यामुळे डांबरी रस्ते, सिमेंट रस्त्यांची दुरावस्था झाली. त्यात पाईप फुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.जीवन प्राधिकरण, कंत्रादटारात असमन्वयमहाराष्टÑ जीवन प्राधिकरण व कंत्राटदारात समन्वय नसल्यानेही ही योजना लांबणीवर पडली आहे. तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहराच्या अनेक भागात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक दिवस-रात्र पाण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करीत आहे. लोकप्रतिनिधी, नगरपंचायत पदाधिकारी, मुख्याधिकारी आदींनी वेळोवेळी याकरिता प्रयत्न केले. तथापि त्यांचे प्रयत्न थिटे पडले. परिणामी भर उन्हाळ्यात २० हजार लोकसंख्येच्या या तालुका, उपविभाग, विधानसभा क्षेत्र मुख्यालयाला दिलासा मिळाला नाही.
सात कोटींची योजना रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:42 PM
साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
ठळक मुद्देराळेगाव वाढीव पाणीपुरवठा : साडेचार वर्षे लोटूनही काम अद्याप सुरूच