४९ लाखांचे प्रकरण : पोलीस पथक कोलकात्यात जाणारयवतमाळ : मोबाईलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच ४९ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळविणाऱ्या तीन हॅकर्सला न्यायालयाने २१ आॅक्टोबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णकुमार मिश्रा (ग्राम जिरादे, जि. सिवाण बिहार), सतीशकुमार यादव (काकीनाडा, परगना पश्चिम बंगाल), राजाभट्टाचार्य (नवाचल्ली बारासात कोलकाता) अशी या आरोपींची नावे आहे. वडगाव रोड पोलिसांनी या आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता २१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. येथील मॅक मोटर्सचे संचालक प्रियांक चंद्रशेखर देशमुख यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून ४९ लाख रुपये १३ आॅक्टोबर रोजी अन्य खात्यात वळविण्यात आले होते. या तीनही आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव, पोलीस कर्मचारी इकबाल शेख, ऋतुराज मेढवे, निलेश राठोड, संतोष मडावी यांनीही सदर आरोपींना पकडण्यासाठी जीवाचे रान केले. अखेर नागपूर व अमरावती पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडण्यात आले. या आरोपींकडून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांचा पडद्यामागील सूत्रधार कोण याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कोलकात्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)
तीनही मोबाईल हॅकर्सला सात दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: October 16, 2015 2:12 AM