अमरावती : जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल चार लाख २२ हजार २९६.३० हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांची लागवड केली. पण जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४३.५२ टक्के शेतीपिकांचेपूर्णतः नुकसान झाले आहे. याच दोन लाख १७ हजार २५९ हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून शासकीय मदत देण्यासाठी १२२ कोटी ६९ लाख ५८ हजार ८७६ रुपयांच्या निधीची गरज असून, तशी मागणी वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत तीन लाख दहा हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नाेंद आहे. यात ३५ मंडळांचा समावेश आहे. पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला पिकाचे नुकसान केले आहे. मूग आणि उडीद हे दोन्ही पिके अतिपावसाने हातातून गेली आहेत. पिकाचे उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी होण्याचा धोका वर्तविला जात आहे.
अमरावती जिल्ह्यात २.७० लाख हेक्टर बाधित झाले असून, जुलै महिन्यात ५६ महसुलात अतिवृष्टी झाली. त्यामुळे २,५०,२६९ शेतकऱ्यांच्या २,७०,९१० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमुळे जिरायती क्षेत्रात २,११,३४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन ९०,५१७.७५ हेक्टर, कपाशी ७५,४५२.३४, तूर ३१,००३, मूग १३.५२, उडीद ३.३६, तीळ ७, मका ३,६९०.२२, ज्वारी २,८९५.६४, मिरची १३५.२५ व इतर पिकांचे १,०७० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.