शिक्षण विभाग : शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम, शिक्षक, आशांनी केले सर्वेक्षणयवतमाळ : संपूर्ण राज्यात एकाच दिवशी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली होती. जिल्ह्यात शनिवारी सलग १२ तासात सहा लाख ५० हजार कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शाळाबाह्य आढळलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले जाणार आहे. गाव, वस्त्या, वाड्या आणि पोडावरही सर्वेक्षण करण्यात आले. यासोबतच शहर आणि गावापासून दूर असलेल्या ठिकाणी सर्वेक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला. १०० कुटुंबामागे एक सर्वेक्षण अधिकारी नियुक्त होते. एकूण सात हजार ८६१ कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आले होते. यात शिक्षक, अंगणवाडीताई, आशा आदींचा समावेश होता. १० सर्वेक्षण अधिकाऱ्यांमागे ३९३ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. २० झोनल अधिकाऱ्यांमागे एक नियंत्रण अधिकारी आणि २७ नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी गाव, खेडे पिंजून काढले. सायंकाळी सात वाजतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात गवसलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वयानुरूप शिक्षण दिले जाणार आहे. याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषदेने पूरक अभ्यासक्रम तयार केला आहे. यासाठी शिक्षकाला अतिरिक्त शिकवावे लागणार आहे. दिवसभर गटात अध्ययन करून घेतले जाणार आहे. (शहर वार्ताहर)
१२ तासांत सात लाख कुटुंबांचे सर्वेक्षण
By admin | Published: July 05, 2015 2:22 AM