वणी : तालुक्यातील तरोडा येथील टिकाराम पुरूषोत्तम हरडे या सुशिक्षीत बेरोजगाराला बनावट नियुक्तीपत्र देऊन सात लाखाने फसवणूक केल्याची तक्रार शिरपूरच्या ठाणेदारांकडे केली आहे. तरोडा येथील टिकाराम हरडे याला लगतच्या वागदरा येथील शशीकांत पाचभाई याने पांढरकवडा येथे शिपाई पदाची नोकरी लावून देतो म्हणून सात लाख रूपये उखळल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. या पदासाठी टिकारामने पाचभाईला ४ जून २०१५ ते ६ जानेवारीपर्यंत तीन लाख ८० हजार रूपये दिले. उर्वरित तीन लाख ८० हजार रूपये रक्कम सुंदनगर येथील मनोहर टोंगे यांच्यादेखत दिले. त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून टिकारामला १७ जून रोजी शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानुसार त्याला पांढरकवडा येथील के.ई.एस.माध्यमिक विद्यालयात रूजू होण्यास सांगितले. त्यानुसार टिकाराम सदर शाळेत गेला असता, मुख्याध्यापकाने ते नियुक्तीपत्र बनावट असून आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे टिकारामच्या लक्षात आले. याबाबत त्याने पाचभाईकडे वारंवार विचारणा केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे टिकाराम प्रचंड हताश झाला. टिकारामला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शिरपूर येथील पोलीस ठाण्यात शशीकांत पाचभाईविरूद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाची वरिष्ठांनी सखोल चौकशी करून शशीकांत पाचभाईविरूद्ध कारवाई करण्यात यावी तसेच सात लाख रूपये परत काढून देण्यात यावे, अशी मागणी टिकाराम हरडे याने शिरपूरच्या ठाणेदारांकडे केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
बेरोजगाराला सात लाखांनी फसविले
By admin | Published: August 13, 2016 1:36 AM