यवतमाळ : येथील व्यावसायिकाने किया मोटर्सची डीलरशिप मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी ऑनलाइन अर्ज केला. त्यामध्ये आवश्यक ती सर्व कागदपत्रे व अटीशर्तींची पूर्तता केली. हा अर्ज मंजूर झाल्याचेही त्यांना सांगण्यात आले. त्यांच्याकडून सुरुवातीला दीड लाख रुपये व नंतर पाच लाख ३० हजार रुपये असे सहा लाख ८७ हजार रुपये आरटीजीएसद्वारे घेण्यात आले. नंतर डीलरशिपसाठी टाळाटाळ केली जाऊ लागली. संशय बळावल्याने थेट आंध्र प्रदेश येथील अनंतपूर येथे जाऊन कंपनी कार्यालयात चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे पुढे आले.
संदीप प्रेमचंद छाजेड, रा. लक्ष्मी दालमील कंपाउंड, धामणगाव रोड असे व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी किया मोटर्स इंडिया लि. अनंतपूर आंध्र प्रदेश यांची डीलरशिप मिळावी यासाठी प्रयत्न केले. माणिक पटनायक नावाच्या व्यक्तीसोबत एप्रिल २०२३ पासून ते व्यवहार करू लागले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संदीप छाजेड यांनी पैशाचा भरणा केला. सुरुवातीला २८ जून रोजी एक लाख ४९ हजार रुपये के.आय. इंडिया प्रा.लि. या नावाने असलेल्या इंडियन ओवरसिज बॅंकेच्या खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर पुन्हा त्याच्या खात्यात आरटीजीएसद्वारे ३ जुलै २०२३ रोजी ॲग्रिमेंट फी म्हणून पैसे जमा केले. हे पैसे मिळाल्याचे ठगाने फोनद्वारे संदीप छाजेड यांना सांगितले.
काही दिवसांंनी पुन्हा डीलर परवाना तयार करण्यासाठी त्याचे शुल्क भरावे असे निर्देश दिले. सातत्याने पैशाची मागणी होत असल्याने संदीप छाजेड यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी याची शहानिशा करण्यासाठी अनंतपूर आंध्र प्रदेश येथे जाऊन किया मोटर्स प्रा.लि.च्या कार्यालयात चौकशी केली. तेथे त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. माणिक पटनायक नावाचा कुणी व्यक्ती कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय केआयए इंडिया प्रा.लि. या नावाने ओवरसीज बॅंकेमध्ये खाते नसल्याचेही सांगण्यात आले. यावरून संदीप छाजेड यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी माणिक पटनायक व्यक्तीविरोधात कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ ड, ६६ क यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवतमाळ शहर ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.