लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली. तर ग्रामीण भागातील रस्ते, पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय विद्युत खांबही कोसळले आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची कामेही त्वरेने हाती घ्यावी लागणार आहेत.केवळ तीन दिवसात जिल्ह्यात ९९.७३ मिलीमीटर पाऊस पडला. पावसाचे हे प्रमाण मासिक सरासरीच्या दीडशे टक्के इतके अधिक आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात सर्वाधिक हानी झाली असून येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नुकसानीचे युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. पाहणीसाठी प्रत्येक तालुक्यात महसूल, कृषी आणि पंचायत विभागाची चमू तयार करण्यात आली. त्या माध्यमातून संयुक्त पंचनामे सुरू आहेत.तालुक्यात नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतशिवारातील पीक पाण्याखाली आले. नदीकाठचे पीक वाहून गेले. केळापूर तालुक्यात ३५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुसद तालुक्यात ७९४ हेक्टर, घाटंजी तालुक्यात दोन हजार हेक्टरचे नुकसान झाले. दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरचे नुकसान झाले. महागाव तालुक्यात नऊ हजार ५६२ हेक्टरचे नुकसान झाले. उमरखेडमध्ये सात हजार ८११ हेक्टरचे नुकसान झाले. तर झरीमध्ये दोन हजार हेक्टरवर नुकसानीची नोंद करण्यात आली.सततच्या पावसाने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामध्ये ३ हजार ७८५ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. ग्रामीण भागातील सर्वेक्षण अद्यापही सुरू आहे. यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेडमध्ये १००, महागाव २५१, दिग्रस ६००, केळापूर २७, पुसद ८४, यवतमाळ ३१, घाटंजी २६, कळंब ४, आर्णी १२७६, दारव्हा तालुक्यात १३८६ घरांची पडझड झाली. उमरखेडमध्ये ४०० घरांना पुराचा धोका निर्माण झाल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शासकीय इमारती आणि रस्त्यांना पावसाचा मोठा फटका बसला. आता सार्वजनिक बांधकाम विभागापुढे दुरुस्तीचे आव्हान आहे. पावसादरम्यान विद्युत खांब आडवे पडले.जिल्ह्यातील जलसाठ्यात समाधानकारक वाढचार प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’मोठा पूस, नवरगाव, सायखेडा आणि बोरगाव हे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. अरूणावती प्रकल्पात २४ तासात ३२ टक्क्यावरून ७५ टक्के जलसाठा निर्माण झाला. बेंबळामध्ये ४९, अडाण ८९, गोकी ५९, वाघाडी ६१, तर अधरपूस प्रकल्पात ८० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम व ९२ लघु अशा १०१ प्रकल्पांमध्ये ६६.४२ टक्के जलसाठा साचला आहे.सरासरीच्या ६७ टक्के पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. आर्णी तालुक्यात ९४ टक्के पाऊस झाला आहे. कळंब आणि राळेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.२० लाखांची तात्काळ मदतछावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या कुटुंबीयांना २० लाख रूपयांची मदत तात्काळ वितरित करण्यात आली. आरोग्य विभागाच्या यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सात तालुक्यांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:02 PM
जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली.
ठळक मुद्दे३ हजार ७८५ घरांची पडझड : २२ हजार हेक्टरवर नुकसान