२१ मेची व्याघ्र गणना : वन्यजीव विभागाकडून आकडेवारी जाहीर, तीन हजारांवर दुर्मिळ प्राण्यांचे वास्तव्य आढळले यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यातील पानवठ्यावर २१ व २२ मेच्या रात्री झालेल्या व्याघ्र गणनेचे आकडे वन्यजीव विभागाने जाहीर केले आहे. त्यात टिपेश्वरमध्ये सात पट्टेदार वाघांचे तर पैनगंगा अभयारण्यात पाच बिबटांचे वास्तव्य आढळून आले. २१ मे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभागामार्फत प्राणी मित्रांच्या मदतीने व्याघ्र गणना करण्यात आली. सर्वच प्रकारच्या प्राण्यांच्या नोंदी या प्रगणनेत घेण्यात आल्या. टिपेश्वरमध्ये पिलखान, भवानखोरी, गोसाईडोह, दर्यापूर, माथनी, सावरगाव, गोसाई, सावंगी, टिपेश्वर, बोथ, भीमकुंड, मारेगाव, सावंगी, एदलापूर, जैतूर आदी ठिकाणी मचानावरुन गणना केली गेली. पैनगंगा अभयारण्यात उमरखेड, बिटरगाव व खरबी या तीन वन परिक्षेत्रातील पानवठ्यांवर प्रगणनेचे काम केले गेले. वाघांच्या अस्तित्वामुळे पर्यटनाचे जिल्ह्यातील मुख्य केंद्र बनलेल्या टिपेश्वरमध्ये सात पट्टेदार वाघांचे वास्तव्य आढळून आले. त्यातील पिलखान येथे दोन, गोसाई डोह रपट्यावर एक, टिपेश्वर मंदिर दोन तर सावरगाव हॅन्डपंप व एदलापूर कुटीजवळ प्रत्येकी एका वाघाचे दर्शन झाले. टिपेश्वरमध्ये एकाही बिबटाचे अस्तित्व आढळून आले नाही. पैनगंगा अभयारण्यात पाच बिबट आढळून आले. त्यातील तीन एकट्या खरबी वन परिक्षेत्रात तर दोन उमरखेड वनपरिक्षेत्रात दिसून आले. टिपेश्वरमध्ये व्याघ्र गणनेत सात वाघांचे अस्तित्व आढळून आले असले तरी प्रत्यक्षात त्या पेक्षा दुप्पट वाघ असल्याचे पर्यटक मानतात. (जिल्हा प्रतिनिधी) टिपेश्वरमध्ये १०६१ दुर्मिळ प्राणीटिपेश्वर अभयारण्यामध्ये प्रगणनेच्या वेळी एकूण १०६१ दुर्मिळ वन्यप्राण्यांचे अस्तित्व आढळून आले. त्यामध्ये पट्टेदार वाघ सात, अस्वल १९, रानडुक्कर २५४, सांभर १६, निलगाय २३०, चितळ १२४, वानर २७०, भेडकी तीन, कोल्हा १४, साप एक, रानमांजर तीन, गरुड तीन, मोर ७६, भोकर ४, उदमांजर एक, ससा सहा, चौसिंगा तीन, सूतार पक्षी तीन, किंगफिशर १६, मसन्याउद एक तर चिंकारा जातीच्या सात हरणांचा समावेश आहे. पैनगंगा अभयारण्यात २१४१ वन्यजीव उमरखेड-महागाव तालुक्यात विखुरलेल्या पैनगंगा अभयारण्यात २१४१ दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व प्रगणनेच्यावेळी दिसून आले. त्यामध्ये बिबट पाच, अस्वल २९, रानडुक्कर १६४, निलगाय ३३८, चितळ ६८, वानर ११३५, भेडकी १८३, कोल्हा २१, मायाड सात, लांडगा ३४, रानमांजर सात, पानकोंबडा दहा, मोर १०८, ससा १२, मैना १, मुंगूस तीन, किंगफिशर दोन, खंड्या पक्षी दोन, साप १, घुबड एक, चिमणी चार, भारतीय तपकिरी पक्षी दोन, हिरव्या मधमाशा खाणारा पक्षी एक, जांभळा सूर्यपक्षी एक व शेपटी लहान असलेल्या एका पक्षाचा समावेश आहे. २१४१ पैकी सर्वाधिक ९७१ दुर्मिळ वन्यजीव एकट्या खरबी वनपरिक्षेत्रात आढळून आले. उमरखेडमध्ये ८४१ तर बिटरगावमध्ये ३२५ वन्यजीवांचा समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पट्टेदार वाघांची संख्या वाढली आहे. वाघांच्या प्रजननासाठी टिपेश्वर उपयुक्त ठिकाण ठरत आहे. - बी.पी. राठोडउपवनसंरक्षक (वन्यजीव) पांढरकवडा
टिपेश्वरमध्ये सात वाघ तर पैनगंगा अभयारण्यात पाच बिबट
By admin | Published: May 25, 2016 12:02 AM