लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूमाफिया मंगेश पन्हाळकर याच्यावर एका सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात एक डॉक्टर आणि मल्टीस्टेट पतसंस्थेतील अज्ञातालासुद्धा आरोपी करण्यात आले आहे.कृष्णमूर्ती सुब्रमण्यम अय्यर रा. इंद्रप्रस्थ सोसायटी श्रीकृष्णनगर दारव्हा रोड यवतमाळ असे या फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात भादंवि ४२०, ४०६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगेश जगन्नाथ पन्हाळकर रा. पिंपळगाव, डॉ. अमोल पंजाबराव मुजमुळे रा. सुभेदार मेडिकलच्या मागे विदर्भ हाऊसिंग सोसायटी, अमोलकचंद कॉलेज रोड, यवतमाळ आणि राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट को.आॅप. सोसायटी यवतमाळमधील अज्ञात व्यक्ती अशा तिघांना यात आरोपी बनविण्यात आले आहे.प्रकरण असे की, कृष्णमूर्ती अय्यर हे जिल्हा परिषद बांधकाम विभागातून उपअभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी हाऊसिंग स्कीम तयार करण्याचा निर्णय अय्यर यांनी घेतला. त्याकरिता त्यांनी शहरातील काही रियल इस्टेटच्या ब्रोकर्ससोबत संपर्क केला. त्यांच्या माध्यमातून जागांबाबत चौकशी केली. दरम्यान सप्टेंबर २०१६ रोजी मंगेश पन्हाळकर व डॉ. अमोल मुजमुले यांनी अय्यर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी भोसा ग्रामपंचायतीच्या मागील बाजूला असलेल्या पाटील (रा. राजन्ना अपार्टमेंट जाजू चौक, यवतमाळ) यांच्या मालकीचे ले-आऊट दाखविले हे ले-आऊट अय्यर यांना पसंत पडले. त्याच्या खरेदीबाबत अंतिम बोलणी झाली. या ले-आऊटचे खरेदीखत करण्यापूर्वी स्टॅम्प ड्युटीसाठी सात लाख ५० हजार रुपये भरावे लागतील असे मुजमुले व मंगेश यांनी सांगितले. म्हणून अय्यर यांनी त्यांना दोन लाख ३० हजार रुपये रोख व उर्वरित पाच लाख १७ हजार रुपयांचे पंजाब नॅशनल बँकेचे धनादेश दिले. हे वेगवेगळे धनादेश मंगेश पन्हाळकर व डॉ. मुजमुले यांच्या नावाने देण्यात आले. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष खरेदीसाठी टाळाटाळ केली गेली. दरम्यान डॉ. मुजमुले यांनी साडेसात लाखांचा धनादेश हमी म्हणून अय्यर यांना दिला. परंतु त्यानंतरही खरेदीस टाळाटाळ होत असल्याचे पाहून अखेर अय्यर यांनी राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट को.आॅप. सोसायटीमध्ये तो साडेसात लाखांचा धनादेश आपल्या बँक खात्यात वटविण्यासाठी टाकला. परंतु हा धनादेश १४ मार्च २०१७ ला बाऊन्स झाल्याचे बँकेतून अय्यर यांना कळविण्यात आले. अय्यर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींचा अज्ञात थांगपत्ता नाही. मंगेश पन्हाळकरविरुद्ध सलग गुन्हे दाखल होत असताना त्याचा शोध घेण्यात ‘एसआयटी’ची (विशेष पोलीस तपास पथक) यंत्रणा अपयशी ठरत आहे.धनादेश अय्यरचा, परत दिला मंगेशला ! : मल्टीस्टेटचा कारभारबाऊन्स झालेला धनादेश व त्यासोबतच रिटर्न मेमो आणण्यासाठी अय्यर राजलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये गेले असता पतसंस्थेने हा धनादेश परस्परच मंगेश पन्हाळकर यांना दिला. वास्तविक या धनादेशासोबत मंगेशचा काहीही संबंध नव्हता. यावरून बँकेच्या एकूणच कारभाराचा अंदाज येतो. बँकेने बाऊन्स धनादेश व मेमो परस्परच मंगेशला देऊन दस्ताची अफरातफर, आर्थिक फसवणूक व विश्वासघात केल्याचा आरोप कृष्णमूर्ती अय्यर यांनी अवधूतवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणात बँकेच्या प्रमुखांनाच दोषी धरावे, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र गुन्हा दाखल करताना पोलिसांनी सध्या तरी राजलक्ष्मी मल्टीस्टेटमधील अज्ञात व्यक्तीला आरोपी बनविले आहे.
भूमाफियावर सातवा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:06 PM
भूमाफिया मंगेश पन्हाळकर याच्यावर एका सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात एक डॉक्टर आणि मल्टीस्टेट पतसंस्थेतील अज्ञातालासुद्धा आरोपी करण्यात आले आहे.
ठळक मुद्देनिवृत्त अभियंत्याची तक्रार : डॉक्टर, मल्टीस्टेटही आरोपी