लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.गावाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. सीताफळांचा बगीचा म्हणून या परिसराची ओळख आहे. तेंदूपत्ता संकलन, शेतीसह पशूपालन असे पूरक व्यसाय करून ग्रामस्थ उदरनिवार्ह करतात. वर्षांपूर्वी या परिसराची सुजलाम, सुफलाम म्हणून ओळख होती. मात्र आता त्याच चुरमुरा गावाचे वैभव शासन व लोकप्रतिनीधींच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात आले आहे.जंगलात बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे सभोवतालच्या विहिरी, बोअर, हातपंप हे पाण्याचे संपूर्ण स्रोतच आटले आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात महिला, पुरुष, बालकांना हंडाभर पाण्यासाठी तास न् तास भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. २०१७ मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत गावकºयांनी सहभाग घेतला होता.येथील काही सामाजिक संघटनांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित करून सलग समतल चर, लूज बोल्ड स्ट्रक्चर बंधारे, सिमेंट बांध, माती नाला बांध, शेततळे, दगडी बांध आदी कामे केली होती. त्यामुळे चुरमुरा गावाने तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळविला होता. गावाला पाच लाखांचे बक्षीस मिळाले होते. मात्र बक्षिसाची रक्कम गावातील तीव्र पाणी टंचाईचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी वापर करण्यास गावातील लोकप्रतीनिधी उदासीन आहे. परिणामी गावकºयांची पिण्याच्या पाण्यावाचून दैना होत आहे.
चुरमुरा येथे तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:42 PM