हरी नरके : बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनतर्फे व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ब्रिटिशांचे मुंबई प्रांताचे शिक्षणासाठीचे बजेट ७० हजार रुपये होते. त्या तुलनेत अगदीच लहान असलेल्या कोल्हापूर संस्थानचे बजेट एक लाख रुपये होते. संस्थानच्या उत्पन्नाचा २३ टक्के खर्च राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणावर केला. एवढे पैसे शिक्षणावर खर्च करणारा राजर्षी हा जगातील एकमेव राजा होता. याशिवाय १९१७ साली सार्वजनिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारा हा पहिला राजा आहे. पाल्य शाळेत गैरहजर राहिला तर दरदिवशी एक रुपया दंड किंवा तुरुंगवास अशी कडक शीक्षा ठोकणारा कायदा त्यांनी लागू केला होता. महात्मा फुलेंचा हा वैचारिक वारसदार शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत कठोर होता, असे प्रतिपादन प्रा.डॉ. हरी नरके यांनी केले. आज पश्चिम महाराष्ट्रात जी सहकार चळवळ फोफावली, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था उभी राहिली त्याचे श्रेयही राजर्षीकडे जाते, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यवतमाळद्वारा आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती समारोहाप्रसंगी ‘फुले-शाहू-आंबेडकर यांचा सामाजिक न्याय’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. नरके पुढे म्हणाले, शिक्षणाचा प्रारंभ खालून वर म्हणजे, शुद्र, अतीशुद्र, स्त्रिया यांच्यापासून व्हावा ही महात्मा फुलेंची इच्छा होती. याच विचाराने प्रेरित होऊन बडोदे येथील संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनीही १९०६ साली सार्वजनिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. शेती आणि औद्योगिक शिक्षण लहानपणापासूनच मुलांना सक्तीचे आणि मोफत करावे, ही फुलेंची इच्छा मात्र अजूनही अपूर्णच आहे. ती अंमलात आली असती तर आज शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली नसती. विशेष म्हणजे, १०० वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर यांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी पुस्तक लिहून त्यात पाच सूत्री कार्यक्रमाचे विवेचन केले आहे. राजर्षी शाहूंची जयंती १९९९ पर्यंत फक्त पश्चिम महाराष्ट्रात साजरी होत असे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून आणि पाठपुरावा करून ती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होण्याचे श्रेय आपले आहे, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. याशिवाय डॉ. आंबेडकरांच्या एका पत्रामुळे शाहू महाराजांची जयंती २६ जुलैला नसून २६ जूनला असल्याचे अस्सल पुरावे शोधल्यानंतरच २६ जून ही जयंती तारीख सर्वमान्य झाली. हाही माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन विनंती इंगळे हिने केले.
शाहू महाराजांचा सर्वाधिक खर्च शिक्षणावर
By admin | Published: July 06, 2017 12:44 AM