विलास गावंडेयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या दैवताच्या आरोग्यासाठी सखोल स्वच्छता संकल्पना आणली आहे. एसटी बस आता आतून बाहेरून घासूनपुसून नियमित स्वच्छ केली जाणार आहे. यासाठी शाम्पू, सोड्याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या या संकल्पनेतून महामंडळाची प्रतिमाही उंचावण्याचा प्रयत्न आहे. राज्यात महामंडळाच्या १७ हजार बसेस धावतात. तशा नेहमीच बसेस धुतल्या जातात. पण, कोरोना महामारीच्या काळात स्वच्छतेला प्राप्त झालेले महत्त्व पाहता, त्यात सखोलता आणण्यात आली आहे. प्रवासी बसलेल्या ठिकाणापासूनही कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी साबणाच्या पाण्याने बसचे आसन, पाठ टेकतो तो भाग घासून साफ केला जाणार आहे.
साबणाच्या पाण्याने कोविड नष्ट होतो, या गृहितकावर आधारित सखोल स्वच्छतेची ही संकल्पना परिवर्तन बसेसपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात प्रत्येक बस याच पध्दतीने स्वच्छ केली जाणार आहे. यामुळे नागरिक एसटीने बिनधास्त प्रवास करतील, असा विश्वास महामंडळाला आहे. खिडक्यांची तावदाने, आसनाच्या समोरील ग्रीप हॅन्डल हे भाग नारळाच्या काथ्या, नायलॉनचा फोम ब्रश याद्वारे स्वच्छ केले जाणार आहेत. फेसयुक्त पाण्यामुळे संपूर्ण बस निर्जंतूक होईल, आतून बाहेरून धुलाईमुळे कळकटलेली बस स्वच्छ होण्यासोबतच मळकट वासही निघून जाईल, असा विश्वास महामंडळाला आहे.
बस धुलाईचे प्रशिक्षणबस कशी धुवावी, याचे सखोल मार्गदर्शन कामगारांना करण्यात आले आहे. सोडा आणि शाम्पूच्या फेसाने बस आतून बाहेरून घासून घ्या, स्पंज अथवा साध्या कापडाने फेसयुक्त पाण्याद्वारे खिडकीच्या काचा पुसा, पाण्याच्या फवाऱ्याने संपूर्ण बस स्वच्छ धुऊन टाका अशा सूचना करण्यात आल्या आहेत.