लाखो रूपये व्यर्थ : गेल्या चार वर्षांपासून सिलींडरचे रिफिलिंग झालेच नाही मारेगाव : शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या सर्व शाळांना पुरविलेले अग्नीशमन यंत्रणे रिफिलींग न केल्याने शाभेच्या वास्तू बनल्या आहेत. काही शाळांनी तर सदर यंत्रणे अडगळीच्या खोलीत टाकून दिले आहेत. कर्नाटकमधील एका शाळेतील कार्यक्रमात पेन्डालला लागलेल्या आगीत काही विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचा धसका घेऊन शिक्षण विभागाने २००५ व २००८ मध्ये सर्व शिक्षा योजनेतून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या सर्व शाळांना अग्नीशमन संयंत्रे घ्यायला लावली होती. तालुक्यातील लहान-मोठ्या सर्व शाळांनी युनिव्हर्सल इंजिनिअरींग कार्पोरेशन घाटकोपर मुंबई बनावटीची संयंत्रे खरेदी केली. त्यावेळी सर्व संयंत्रे शाळेच्या खोलीच्या भिंतीला लटकवून ठेवली. त्याचा वापर केव्हा, कसा करावा, कोणती खबरदारी घ्यावी, रिफीलिंग केव्हा करावे, याचे प्रशिक्षणसुद्धा सर्व शिक्षकांना देण्यात आले नसल्याचे समजते. भिंतीला असलेले लाल रंगाचे बंब कशाचे आहे, हे अद्याप विद्यार्थ्यांना माहिती नसून रिफीलींगबाबत शिक्षकसुद्धा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर २०१२ मध्ये ढोलणे नामक गटशिक्षणाधिकारी या पंचायत समितीमध्ये असताना प्रत्येकी ३०० ते ५०० रूपये खर्च आकारून यवतमाळच्या एका कंपनीमार्फत सर्व शाळांचे रि-रिफिलींग करून घेण्यात आले होते. तेव्हापासून चार वर्षाचा काळ लोटूनसुद्धा सिलींडर रिफिलींग केले नसल्याने सर्व अग्नीशमन यंत्रे कुचकामी ठरले असून केवळ भिंतीची शोभा वाढवित आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी यावर विचार करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
शाळेतील अग्नीशमन संयंत्रे बनली शाभेची वास्तू
By admin | Published: August 07, 2016 1:16 AM