राळेगाव : सीतेच्या पदस्पर्शाने रावेरी गावाला ऐतिहासिक मूल्य लाभले. मात्र दुर्लक्षामुळे येथील सीता मंदिरावर अवकळा पसरली होती. परंतु शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या पुढाकाराने मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि पर्यटकांची गर्दी वाढली. काही दिवसांपूर्वीच शरद जोशी यांची प्राणज्योत मालवली. परंतु अखेरच्या क्षणातही त्यांच्या मनात सीता मंदिराचाच मुद्दा घोळत होता. म्हणूनच आपल्या मृत्युपत्रात त्यांनी रावेरीच्या मंदिरासाठी १३ लाखांची तरतूद करून ठेवली.शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठीच शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आयुष्य खर्ची घातले. २००१ मध्ये राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय महिला अधिवेशन झाले. त्यावेळी जोशी यांनी येथील सीता मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शरद जोशी यांनी जीर्णोद्धारासाठी वैयक्तिकरीत्या १० लाख रुपयांची मदत केली होती. त्यामुळेच मंदिराचा कायापालट होऊन आज मंदिराचे नवे रूप पाहण्यासाठी अनेक भक्त येत आहेत. शनिवारी, रविवारी तर स्वयंपाक आणून महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. शरद जोशी यांच्या प्रयत्नाने परिसरात सभागृह, पाण्याची व्यवस्था झाली. पाच लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून बगिचा बहरला आहे. २०१० साली येथे शेतकरी संघटनेचेही अधिवेशन झाले. त्यावेळी येथे समाज मंदिर, स्त्री जागृती केंद्र स्थापन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रावेरीतील मंदिरासाठी शरद जोशी यांनी मृत्युपत्रात १३ लाखांची घोषणा केली असून या बाबीकडे रवी काशिकर लक्ष पुरविणार आहेत. (प्रतिनिधी)
शरद जोशींचे रावेरी मंदिराला १३ लाख
By admin | Published: December 27, 2015 2:44 AM