लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला निघालेल्या अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी यवतमाळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर त्याचवेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला म्हणून कौतुकही केले. भाजपच्या एका नेत्यावर टीकास्त्र, तर दुसऱ्याचे गुणगान करण्यामागे पवारांची काय खेळी असावी, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय गोटात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी रात्री मानोरा येथून यवतमाळात दाखल झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे, आघाडी सरकारच्या कार्यकाळात असलेले राज्यावरील कर्ज युती सरकारमध्ये दुप्पट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात धार्जिण्या धोरणांना स्वीकारण्यात धन्यता मानत असल्याने महाराष्ट्राची ही स्थिती झाली आहे. दिल्लीतून येणारे आदेश मुख्यमंत्री शिरसावंद्य माणून कोणताही विचार न करता लगेच अंमलबजावणी करतात, अशी टीका पवार यांनी पत्रपरिषदेत केली.पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीचे आव्हान देताना आमच्या समोर कुणी पहेलवान दिसत नाही असे म्हणतात. मात्र त्यांनी या मुद्यावर बोलण्याऐवजी पाच वर्षाच्या सत्तेत किती नवीन उद्योग आणले, किती बंद पडले, किती रोजगार निर्माण झाले, किती कामगार बेरोजगार झाले, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे स्पष्ट करावे. महाराष्ट्रात गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही. येथील स्त्रीयांवरील अत्याचार वाढत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना बगल देऊन ३७० कलम रद्द केले. हे समाजाच्या व राज्याच्या हिताचे नाही.
बुलेट ट्रेन गुजरातच्या सोईसाठीराज्यावर कर्जाचा डोंगर असताना गुजरातच्या सोईसाठी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला. यात हजारो कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले. या ट्रेन ऐवजी दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा रेल्वे मार्ग घेतला असता तर विदर्भ, मराठवाड्याला फायदा झाला असता. विदर्भाला पूर्ण सत्तेतील मुख्यमंत्री मिळाले, मात्र पाच वर्षात येथे कोणताच विकास झाला नाही. येथील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यावरून महाराष्ट्रात इतरत्र काय स्थिती असेल हे लक्षात येते. राज्यातील नाशिक, खान्देश या गुजरात सीमेजवळच्या भागात दरवर्षी अतिवृष्टी होते. येथील पाणी गुजरातकडे वाहून जाते. हे पाणी महाराष्टष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा व इतर भागात वळते केल्यास सिंचनाची क्षमता वाढविणे शक्य आहे. मात्र यावर मुख्यमंत्री काम करणार नाही.
कापसाला सात हजार भाव मागणारे सत्तेतदेवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना विविध आंदोलनांच्या माध्यमातून अनेक मागण्या करीत होते. सोयाबीन व कापूस यासाठी सात हजारांचा भाव त्यांनी मागितला होता. जनतेने विश्वासाने सत्ता त्यांच्या हातात सोपविली. मात्र त्यांनी ज्या मुद्यांवर आंदोलने केली, त्याची पूर्तता स्वत: सत्तेत राहून केली नाही. उलट महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातकडे कशी वळविता येईल यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
एकही नवा उद्योग आला नाहीगेल्या पाच वर्षात यवतमाळ शहरात कोणत्या उद्योगाची भर पडली हे सत्ताधाऱ्यांनी सांगावे, उलट येथील सुरू असलेले उद्योग डबघाईस आले आहेत. अशीच स्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. नाशिकमध्ये १५ हजार कामगार बेरोजगार झाले. एका एमआयडीसीची स्थिती अशी असेल तर देशपातळीवर विचारही करता येणार नाही. शासनाची जेट विमान कंपनी बंद पडली. २० हजार कामगार बेरोजगार झाले. आता बीपीसीएल ही आॅईल कंपनी सरकारने विकायला काढली आहे. आघाडी सरकारच्या काळात सुस्थितीत असलेल्या विविध सरकारी कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे डबघाईस आल्या. आता त्यांनी या कंपन्या विकायला काढल्या आहे.
तरुणांना आता परिवर्तन हवेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षे विरोधकांना शिव्याशाप देण्याचे काम केले. त्यामुळे आता तरुणांना परिवर्तन हवे आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा व विविध सभा यातून परिवर्तनाचे वातावरण दिसत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, माजी सभापती सुभाष ठोकळ आदी उपस्थित होते.
विदर्भात नितीन गडकरींनी आणला निधीविदर्भात जे काही रस्ते आज तयार झाले आहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणले आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेच ठोस काम केले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला.लिंबू, मिरचीवर विश्वास नाहीराफेल विमानाची देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी लिंबू ठेऊन पूजाअर्चा केली. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, लिंबू, मिरचीवर माझा विश्वास नाही. लिंबू, मिरची टांगून पूजा करणाऱ्यांना धन्यच मानायला हवे या शब्दात त्यांनी माजी संरक्षणमंत्री म्हणून प्रतिक्रिया दिली.