विजय दर्डा यांनी दिली भेट : पाच दिवसात साकारले व्यक्तिशिल्पनीलेश यमसनवार ल्ल पाटणबोरी सबंध देशाच्या राजकारणावर वेगळी छाप पाडणारे शरद पवार यांचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त खासदार विजय दर्डा यांनी सप्रेम भेट दिलेला पूर्णाकृती पुतळा सर्वांचे लक्ष वेधणारा होता. शरद पवारांचे हे अमृतमहोत्सवी व्यक्तिशिल्प साकारणारा कलावंत मात्र पाटणबोरीसारख्या छोट्याशा गावातला आहे. अवघ्या पाच दिवसात शिल्प साकारणाऱ्या कलावंताचे नाव आहे संतोष एनगुर्तीवार.संतोषला आपल्या पणजोबांपासूनच शिल्पकलेचा वारसा लाभला आहे. अत्यंत गरिबीतून पुढे आलेला संतोष आज मुंबईत जाऊन जगभर आपली कला पोहोचवत आहे. मात्र पाटणबोरीत येऊन शिल्प घडविण्याचा आनंद काही औरच असल्याचे तो सांगतो. काही दिवसांपूर्वी तो पाटणबोरीत असतानाच किरण अदाटे या मित्राने त्याला एक सुखद वार्ता दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुर्णाकृती पुतळा बनविण्याची आॅर्डर त्याला मिळाली. केवळ पाच दिवसांचा वेळ होता. पण संतोषने अवघ्या पाच दिवसांतच हा २६ इंचांचा आकर्षक पुतळा साकारला. तीन दिवस केवळ मातीकाम केले आणि दोन दिवसांत त्यावर ब्रांझचा मेटल ईफेक्ट दिला. शाडू माती आणि फायबर ग्लासचा यात वापर करण्यात आला. खास भावनगरहून (गुजरात) आणलेली शाडू माती वापरली गेली. शरद पवारांचे भव्य व्यक्तिमत्त्व या शिल्पात हुबेहुब चितारले आहे. कृषीक्षेत्रातील त्यांची आवड दाखविण्यासाठी उसाच्या मोळीवर हात ठेवून उभे असलेले शरद पवार संतोषने साकारले. १२ डिसेंबरला खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते शरद पवार यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ही कलाकृती सप्रेम भेट देण्यात आली. केवळ शरद पवारच नव्हेतर, संतोषने आजवर अनेक नामवंतांची व्यक्तिशिल्पे साकारली आहेत. त्यात इंदिरा गांधी, सत्यसाई बाबा, त्यांच्या आई ईश्वर अम्मा, बाबू जगजीवनराम, जयपूरचे समाजसेवक सुहास जैन, आदिलाबादचे माजी नगराध्यक्ष लाला राधेश्याम यांचा समावेश आहे. संतोषने घडविलेले येशूचे शिल्प अमेरिकेत पोहोचलेय. तर नेल्सन मंडेलाचे शिल्प दक्षीण अफ्रिकेत सर्वप्रिय झाले. संतोषचे पणजोबा सखाराम पोतदार एनगुर्तीवार, आजोबा पुंडलिकराव, वडील एकनाथराव हे सारेच शिल्पकार. हाच वारसा संतोष आणि त्याचे भाऊ सतीश, प्रकाश, यशवंत पुढे चालवित आहेत. गेल्यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या ‘पंढरीची वारी’ या देखाव्याला देशातून पहिला क्रमांक मिळाला. हा देखावा घडविण्यात यशवंतचा मोठा वाटा होता. मातीतून जिवंत शिल्प घडविणाऱ्या संतोषने गरिबीशी मात्र मोठी झुंज दिली. पाटणबोरीत रोजमजुरी करत अकरावतीपर्यंत शिकल्यानंतर त्याला महेश झिलपिलवार या मित्राने शिल्पकलेतच करिअर करण्याचा सल्ला दिला. त्यासाठीच्या शिक्षणाचा खर्चही महेशनेच उचलला. त्यावेळी मुंबईला जाण्यासाठी संतोषकडे पैसे नव्हते, तेव्हा गुरु भट, शिक्षक आर. एन. पाटील, बाभूळकर यांनी मदत केल्याचे संतोष सांगतो. पाटणबोरीत संतोष आणि त्याच्या वडिलांनी व भावांनी घडविलेल्या गणेश-दुर्गामूर्ती प्रसिद्ध आहेत. आदिलाबादपासून पांढरकवड्यापर्यंत या मूर्ती जातात. शरद पवार हे माझे आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच हे शिल्प घडविता आले. ग्रामीण भागातही कलेचे दर्दी आहेत. पण कलेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुंबईनगरीच उत्तम आहे. पाटणबोरी परिसरातच आपली कला फुलविण्याची माझी ईच्छा आहे. माधवराव महाराज यांची कृपा आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने ही कला बहरत आहे.- संतोष एनगुर्तीवार, शिल्पकार, पाटणबोरी.
शरद पवारांचा अमृतमहोत्सवी पुतळा घडला पाटणबोरीत
By admin | Published: January 02, 2016 8:36 AM