लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, बोंडअळीच्या मदतीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे गेलाच नसल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आंदोलनस्थळी केला.राज्य विधीमंडळात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार रूपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत सरसकट व विनाविलंब देण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघर्ष समिती, काँग्रेस, मनसे, राष्ट्रीय युवा संघटन, शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटना, बेंबळा कालवे संघर्ष समिती आदींनी चक्री धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण करून सरकारचा निषेध केला.आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी खासदार गवळी यांनी शिवसेना सदैव शेतकरी आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्यांसोबत असल्याचे सांगितले. सरकारचे धोरण चुकीचे असून लोकसभेत या विरोधात रान उठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तिसऱ्या दिवशी या आंदोलनात पुसद विधानसभा मतदार संघातील शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असलेल्या फडणवीस सरकारच्या निषेधार्थ मुंडण केले. कीर्तनकार नंदकुमार माळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना बोलके करणारे कीर्तन सादर केले.या आंदोलनात रविवारी डॉ. वजाहत मिर्झा, डॉ.मो.नदीम, अशोक बोबडे, प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अजय पुरोहित, सुधीर जवादे, माधुरी अराठे, दिनेश गोगरकर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, जक्की अन्वर, किशोर राठोड, मनमोहनसिंग चव्हाण, प्रभाकर उईके, जियाभाई, सुभाष राठोड, पंडितराव देशमुख, बाळू दरणे, नईम इजारदार, गोपाल राठोड, अमजद बिल्डर, नाने खान, शेख चाँद, समीर शेख रमजान, बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, तुकाराम हटकर, अब्दुल सलाम अब्दुल सत्तार, उत्तम पवार, जयश्री देसाई, वीणा नागदिवे, ममता मिश्रा, सुनीता पाटील, मनीषा मेसेकर, शुभांगी गलांडे आदी सहभागी होते.मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलेला मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे नाही - गवळीचक्रीधरणे आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा देत सरकार विरोधात हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलेल्या मदतीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे मंजुरीसाठी आला नसल्याचा गौप्यस्फोट खासदार भावना गवळी यांनी केला. त्यांनी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून भांडू आणि लोकसभेतही कलम १९३ नुसार चर्चेसाठी सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही दिली. केंद्राच्या दुष्काळी मदतीसाठी अद्याप राज्याचा प्रस्ताव नाही. बियाणे कंपन्या न्यायालयात जाणार आहे. अशावेळी सरकारने स्वत:च्या खिशातील पैसे शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
शासनाच्या निषेधार्थ मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:41 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
ठळक मुद्देचक्रीधरणे : तिसऱ्या दिवशी पुसदमधील शेतकऱ्यांचे आंदोलन