यवतमाळ : यवतमाळची १८ वर्षीय तरुणी शौर्या गोविंद बजाज हिने अत्यंत कठीण समजले जाणारे लेह-लडाख भागातील माऊंट कायगर-री शिखर ६,१७६ मीटरची चढाई करीत सर केले. यामुळे गिर्यारोहणाच्या इतिहासात शौर्याच्या नावाची नोंद झाली आहे. महिला क्षेत्रातील तिची ही कामगिरी प्रेरणादायी आहे.
विशेष म्हणजे, तापमानाचा पारा उणे ३७ सेल्सिअसपर्यंत खाली असताना प्रचंड थंडी आणि सतत वाहणाऱ्या हिमवाऱ्यामध्ये तिने ही कामगिरी यशस्वी केली. कमी वयात हे शिखर सर केल्याचा विक्रम तिच्या नावे नोंदविला गेला.
लेह-लडाखमधील अत्यंत कठीण समजले जाणारे कायगर-री शिखर सर केल्यानंतर गिर्यारोहक शौर्या बजाज हिने तिरंगा फडकविला.
कडाक्याच्या हिमवाऱ्याने या मोहिमेत माझ्या क्षमतेची अनेकदा कसोटी पाहिली. परंतु मी माझ्या ध्येयावर ठाम होते. हे शिखर पादाक्रांंत केल्यानंतर दिसणारं दृश्य या कष्टाची भरपाई करणारं आहे. दृढनिश्चय केल्यास काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.- शौर्या गोविंद बजाज, गिर्यारोहक
धोकादायक भूप्रदेश आणि अनिश्चित हवामान‘व्हाईट एक्सपेडिशन’ने या गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन केले होते. जागतिक दर्जाचे प्रसिद्ध गिर्यारोहक रिकी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम शौर्या हिने यशस्वी केली. अफाट शारीरिक क्षमता, दृढनिश्चय आणि कणखर मानसिक सहनशक्ती यामुळे शौर्या यात यशस्वी झाली. गिर्यारोहणासाठी हे शिखर अत्यंत आव्हानात्मक आहे.
धोकादायक भूप्रदेश आणि उंच पर्वतावरील अनिश्चित हवामान त्यामुळे चढाईदरम्यान शौर्याला अनेकदा कमालीचा संयम आणि कौशल्य दाखवावे लागल्याचे या मोहिमेचे प्रमुख रिकी यांनी सांगितले. ते म्हणाले की, मानसिक ताकद आणि उत्कृष्ट शारीरिक तयारी तसेच सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच अत्यंत कठीण परिस्थितीत शौर्याने हा इतिहास रचला.
तिची ही कामगिरी जगभरातील तरुण गिर्यारोहकांना मोठे स्वप्न पाहण्यास आणि त्यासाठी धाडस करण्याची प्रेरणा देते. तिची ही यशस्वी तसेच ऐतिहासिक मोहीम गिर्यारोहकांसाठी अभिमानाचा क्षण आहे. शौर्याची ही कामगिरी गिर्यारोहण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शौर्या ही यवतमाळ येथील प्रसिद्ध उद्योजक गोविंद बजाज आणि शिल्पी बजाज या दाम्पत्याची मुलगी आहे.