यवतमाळ : ती माझी आहे, तु तिच्यासोबत लग्न केले आता तू आत्महत्या कर नाही तर तुला ठार करतो अशा धमक्या देवून नवविवाहित युवकाला आत्महत्यास करण्यास भाग पाडले. ही गंभीर घटना उमरखेड तालुक्यातील देवसरी येथे घडली. या प्रकरणी २२ वर्षीय युवकाविरुद्ध उमरखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
अनंता सुभाष खापरे (२४) रा. देवसरी असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा काही महिन्यापूर्वी विवाह झाला होता. मात्र नंतर त्याला एका मोबाईलवरून धमक्या मिळू लागल्या. तु ज्या मुलीसोबत विवाह केला ती माझी प्रेयसी आहे. तू आत्महत्या कर, नंतर मी तिच्याशी विवाह करतो, असे केले नाही तर तुला जिवानिशी ठार करतो, अशा स्वरूपाच्या धमक्या आरोपी सुनील राठोड (२२) रा. आकोली ता. उमरखेड याच्याकडून देण्यात येत होत्या. सुनील अनंताला मोबाईलवर फोन करून, एसएमएस करून सातत्याने धमकावत होता. यामुळे कंटाळलेल्या अनंताने १५ नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुभाष खापरे यांनी पोलिसात तक्रार देवून मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या युवकाविरुद्ध कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कलम ३०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.
प्रेमासाठी वाट्टेल ते...
प्रेमासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. विवाहित प्रेयसीचा संसार मोडण्याचे काम युवकाने केले. आता तो स्वत: गंभीर गुन्ह्यात आरोपी झाला आहे. या विचित्र घटनेने उमरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेमके काय साध्य केले, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"