सर्पदंशाने मृत्यूशी झुंज : उमरखेड शासकीय रुग्णालयात शर्थीचे प्रयत्नअविनाश खंदारे उमरखेड रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने प्राण कंठाशी आला होता. अशा अवस्थेत तिला उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. शेख मोहम्मद गौस यांनी शर्थीचे प्रयत्न करून विवाहितेला मृत्यूच्या कराल दाढेतून ओढून आणले. शासकीय रुग्णालयात मिळालेल्या या उपचाराने विवाहितेला जीवदान मिळाले. शिल्पा चंद्रमणी जोगदंडे (२५) असे डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळालेल्या विवाहितेचे नाव आहे. तालुक्यातील पळशी येथील बबन योगाजी कोल्हे यांची ती कन्या होय. रक्षाबंधनासाठी ती रविवारी माहेरी आली होती. घरात स्वयंपाक करत असताना एका विषारी सापाने तिला दंश केला. आई छाया व वडील बबन यांनी आरडओरडा केला. शिल्पाच्या तोंडाला फेस येऊन ती बेशुद्ध पडली. ही माहिती माजी सरपंच विलास सोळंके यांना मिळताच त्यांनी तात्काळ शिल्पाला उमरखेडच्या शासकीय रुगणालयात दाखल केले. रुग्णालयात सर्पदंशावर उपचार करणारे डॉ. श्रीकांत जयस्वाल औरंगाबाद येथे गेले होते. आता काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. नांदेडला पाठविले तर प्राण जाण्याची शक्यता होती. त्याचवेळी तेथी डॉ. शेख मोहंमद गौस मदतीला धावून आले. डॉ. गौस यांनी तात्काळ डॉ. जयस्वाल यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. शिल्पाचे प्राण वाचवायचेच अशी खूनगाठ मनाशी बांधली. रविवारी रात्री सुरू झालेला औषधोउपचार २४ तास सुरू होता. रात्रभर डॉ. जयस्वाल फोनवरून डॉ. गौस यांना मार्गदर्शन करीत होते. डॉ. गौस यांच्या मदतीला परिचारीका शीलत बोडगे, तेजल बोडगे, शिवा सावळे होते. २४ तासाच्या उपचारानंतर शिल्पाने डोळे उघडले. मुलगी धोक्याबाहेर आल्याचे पाहताच आई-वडिलांच्या डोळ््यात अश्रुधारा लागल्या. डॉक्टरांच्या प्रयत्नाने शिल्पाने मृत्यूवरही विजय मिळविला. तिच्यासाठी डॉ. गौस देवदूत ठरले. डॉ. गौस हे मूळ ढाणकी येथील रहिवासी आणि उमरखेड पंचायत समितीचे माजी सभापती शेख ख्वाजाभाई कुरेशी यांचे पुत्र होय. मुस्लीम महिलांनी केली प्रार्थनाउमरखेड शासकीय रुग्णालयात शिल्पाला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. यावेळी रुग्णालयात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी शिल्पासाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम महिलांनी शिल्पाचे प्राण वाचावे म्हणून करूणा भाकली. जातीपातीच्या भिंती बाजुला सारून शिल्पासाठी सर्वजण प्रार्थना करीत होते. या घटनेने माणूसकीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचाही प्रयत्य आला.
पळशीच्या शिल्पासाठी शेख मोहम्मद ठरले देवदूत
By admin | Published: August 24, 2016 12:59 AM