घाटंजी : महाआवास अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना येथील पंचायत समिती सभागृहात ई-गृहप्रवेश कार्यक्रमात चाव्या प्रदान करण्यात आल्या.
पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या. शासनाने गोरगरीब, कष्टकरी, कामगार, आदिवासी यांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रथम इंदिरा आवास योजना सुरू केली. कालांतराने प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकूल योजना, रमाई आवास योजना, आदिम जमाती योजना आदींचा समावेश करण्यात आला.
आता घरकूल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यासाठी ई-गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. पंचायत समिती सभागृहात अमोल प्रकाश भगत, संगीता दिनेश दुबे, गोविंदा मडावी यांना घरकूल चाब्या सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या येरंडगाव येथील सरपंच दीपाली प्रफुल गावंडे, उपसरपंच अमोल ठाकरे, ग्रामसेवक मंगेश कुऱ्हाडकर, तलाठी भाऊ सिडाम, आशा स्वयंसेविका संगीता जाधव यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सभापती नीता आकाश जाधव, उपसभापती सुहास देशमुख पारवेकर, तहसीलदार पूजा माटोडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, रणधीर आत्राम, नीलेश मानगावकर यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.