चिमुकल्या हातांची किमया : चिखलमय रस्ता झाला सुखमय, शिक्षकांच्या प्रेरणेने विद्यार्थ्याना हुरुप विठ्ठल कांबळे ल्ल घाटंजी ते दररोज चिखल तुडवित शाळेत जात होते. कोणतीही कुरकूर नव्हती. कुणालाही दोष नव्हता. ना ग्रामपंचायतीकडे तक्रार, ना पुढाऱ्यांच्या नावे बोटे मोडणे. त्यांनीच एक दिवस मनात आणले, चिखलात एक-एक दगड टाकला आणि काही दिवसात शाळेत जाण्यासाठी खडतर का होईना परंतु सुखकर रस्ता तयार झाला. ही किमया घाटंजी तालुक्यातील शिवणी पोडावरील पहिली ते पाचवीच्या २९ विद्यार्थ्यांनी केली. आज या रस्त्यावरून ते चिमुकले हसतमुखाने शाळेत जात आहे. घाटंजी तालुक्यातील शिवणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर शिवणी पोड आहे. ५०० लोकवस्तीचे गाव आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत २९ विद्यार्थी शिक्षण घेतात. दोन शिक्षक आहे. परंतु या पोडाला जोडणारा पक्का रस्ता नाही. आहे तो रस्ता म्हणजे केवळ पायवाटच. एवढा अरुंद की, रस्त्याच्या दोनही बाजूला शेताचे काटेरी कुंपन आहे. पावसाळ्यात तर विचारता सोय नाही. रस्त्यावरून पाणी वाहत असते. चिखल असतो. याच रस्त्यावरून विद्यार्थी दररोज आपल्या शाळेत जातात. कुणाचे कपडे चिखलाने माखतात, तर कुणी पाय घसरुन पडतात. असेच हाल गावकऱ्यांचेही होत आहे. या शाळेतील शिक्षक प्रदीप जाधव आणि पुंडलिक आत्राम या शिक्षकांनी या रस्त्याचा अनुभव घेतला. मात्र कुणाला दोष देण्यापेक्षा त्यांनी आपल्याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. दुपारच्या सुटीत या दोन शिक्षकांनी आजूबाजूचे दगड आणून चिखलात टाकले. मुलांनाही हुरुप आला. त्यांनी शिक्षकांना साथ दिली. ‘साथी हाथ बढाना, साथी रे’ या प्रमाणे विद्यार्थी एकवटले, ताकद वाढली. पाहता पाहता चिखलात दगडांची रास पडली. चिखल खाली दबला गेला आणि विद्यार्थ्यांसाठी सुखकर रस्ता तयार झाला. छोटासा का होईना परंतु रस्ता झाला. इतरांना दोष देणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात या चिमुकल्या हातांनी झणझणीत अंजन भरले. कुणी कुणाविरुद्ध तक्रार केली की ग्रामपंचायतीच्या मुरुमाची प्रतीक्षा केली नाही. केवळ आपल्या चिमुकल्या हातांनी ही किमया करून दाखविली.
शिवणीच्या विद्यार्थ्यांनी स्वत:च बांधला रस्ता
By admin | Published: July 28, 2016 12:57 AM