ठाणेदारांना निवेदन : अवैध दारूविक्रीमुळे गावात वाढले तंटे लोकमत न्यूज नेटवर्क पोफाळी : उमरखेड तालुक्यातील शिळोणा येथील महिला गावात संपूर्ण दारुबंदी व्हावी, गावठी दारू विकल्या जाऊ नये या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर धडकले. शिळोणा येथे गेल्या काही महिन्यांमध्ये दारुचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गावठी दारू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार होऊन ती विकल्या जाते. त्यामुळे नागरिक व्यसनाधिन होत आहे. घराघरात भांडणे लागली आहेत. त्यामुळे दारूचे अवैध उत्पादन व विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी महिलांची आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. यापूर्वी शिळोणा येथील गावठी दारु विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. परंतु पुन्हा आता अवैध दारू विक्रीने तोंड वर काढले आहे. त्यामुळे गावाचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. शिळोणा गावाला पूर्णपणे दारूमुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन प्रभारी ठाणेदार बोरकर यांना महिलांनी दिले. यावेळी मंगला कोल्हे, छाया वाघमारे, मंगला ढोबळे, वंदना खंदारे, विमल कोल्हे, रमा कोल्हे, राधा कोल्हे, आशा कांबळे, शांता कोल्हे, निला कोल्हे, सीता कोल्हे आदींसह महिलांची मोठी उपस्थिती होती. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणेदार बोरकर यांनी दिले.
शिळोणा येथील महिलांची दारुबंदीसाठी धडक
By admin | Published: May 19, 2017 1:55 AM