यवतमाळ : राज्य व केंद्र सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. फसवे अभियान राबवित आहे. जिल्ह्यासह संपर्ण राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. साडेचार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ५९ हजारजणांना पीक विम्याचा लाभ मिळाला. याचाही गवगवा स्थानिक पालकमंत्री करीत आहे. शासनाच्या नार्केतेपणाचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी निषेध आंदोलन केले. त्यांनी शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी, शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध केला.
शासनाचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी काळी दिवाळी साजरी केली. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजना व घोषणा फसव्या निघाल्या. आज शेतकरी अतिवृष्टीचा सामना करून बेजार झाला आहे. नापिकीचे वर्ष असतानाही जिल्ह्याची पीक आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक काढण्यात आली आहे. सोयाबीन, कापूस या पिकाचे उत्पन्नच हाती आले नाही व दुसरीकडे हक्काच्या पीक विम्याचा लाभही मिळाला नाही. प्रचंड लागवड खर्च येऊन आता शेतमालाला बाजारात भाव नाही. शासन हमी दर देण्यास तयार नाही. केवळ शासन आपल्या दारीचा देखावा करीत जनतेच्या पैशाची उधळपट्टी स्वत:च्या प्रचार, प्रसिद्धीवर करीत आहे. अशा प्रकारचा आरोप या आंदोलनातून करण्यात आला. यावेळी शेतकरी बबनराव घुले यांनी आपल्या व्यथा मांडत दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खावून शासनाचा निषेध केला. जिल्हा प्रमुख कल्पना दरवई यांनी आंदोलन स्थळी झुणका भाकर व ठेचा तयार केला. या आंदोलनात जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, प्रवीण शिंदे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, अतुल गुल्हाने, विनोद पवार, गजानन पाटील, संजय कोल्हे, चंद्रकांत उडाखे, संदीप सरोदे, सिकंदर शाह, राजीक खान, ॲड. श्रीकांत माकोडे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते