यवतमाळ : शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदाराविरुद्ध जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले. यवतमाळ जिल्ह्यातील गद्दार आमदाराला फिरू देणार नाही, त्याची पूजा चव्हाण प्रकरणाशी संबंधित सीडीच बाहेर काढू यासारखी अनेक प्रकरणे त्याने केली आहे. स्वत:च्या समाजाची फसवणूक केलेल्या आमदार संजय राठोडला सोडणार नाही, अशा शब्दात सोमवारी निघालेल्या निषेध मोर्चात शिवसैनिकांनी हुंकार व्यक्त केला.
रस्त्यावर असणाऱ्यांना शिवसैनिकांनी जनमताच्या बळावर आमदार, खासदार, मंत्री बनविले. त्यांनी करोडोची माया जमविली. भाजपने ईडीचा धाक दाखविताच हे मंत्री, आमदार शिवसेनेसोबत गद्दार झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मोडून ते भाजपच्या दावणीला बांधले गेले अशा गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिवसेनेच्या तीनही जिल्हाप्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक टिळक स्मारक भवनमध्ये शिवसैनिकांची सभा झाली. यात जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे, बाबू पाटील जैत, नितीन माकोडे, प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, ॲड. बळीराम मुटकुळे, चितांगराव कदम, दिगंबर मस्के, प्रमोद भरवाडे, संजय रंगे, राजू तुराणकर यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसैनिकांनी टिळक भवन ते दत्त चौक असा मोर्चा काढला. दत्त चौकात एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. तीव्र शब्दात शिवसैनिकांनी आपल्या भावना मांडल्या. येणाऱ्या निवडणुकांमध्ये या गद्दारांचा हिशेब केला जाईल, ज्यांनी तळ्यात-मळ्यात भूमिका ठेवली अशांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात शिवसेना वाढू नये याचे कटकारस्थान आमदार संजय राठोड यांनी रचले. इतर सहकाऱ्यांना कधीच मोठे होऊ दिले नाही. ज्यांनी शिवसेनेची कठीण परिस्थितीत साथ सोडली, अशा पदाधिकाऱ्यांचीसुद्धा पदावरून हकालपट्टी करणार असल्याचे पराग पिंगळे यांनी सांगितले.
दत्त चौकात आंदोलनानंतर मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. त्यांना दक्षता भवन येथे ठेवण्यात आले. दरम्यान, निषेध मोर्चा निघणार असल्याने संजय राठोड यांच्या घर व कार्यालयाला कडेकोट सुरक्षा देण्यात आली होती. जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आले होते. आमदार संजय राठोड यांनी पभासोबत गद्दारी करू नये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी परत यावे असेही आवाहन आंदोलनादरम्यान करण्यात आले.
नेर तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक
आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील नेर तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक निषेध मोर्चात सहभागी झाले होते. तेथील तालुकाप्रमुख गैरहजर राहिले. मात्र तालुक्यातील बाबू पाटील जैत, नितीन माकोडे, स्नेहल भाकरे, किरण राठोड, निखिल जैत यांच्यासह अनेक दिग्गज पदाधिकारी-कार्यकर्ते मोर्चात होते. मात्र दारव्हा व दिग्रस या तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक निषेध मोर्चात सहभागी झाले नव्हते.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातील शिवसैनिक निषेध मोर्चात
जिल्हाभरातून शिवसैनिक उत्स्फूर्तपणे निषेध मोर्चात सहभागी झाले. १४ तालुक्यांतील तालुकाप्रमुख व पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोर्चात सहभागी होत, गद्दारांना क्षमा करणार नाही, जनतेतून जाऊन त्यांचा हिशेब चुकता करू, संपूर्ण शिवसेना संजय राठोड विरोधात मतदारसंघात उभी राहील, असा निर्धार व्यक्त करीत निषेध नोंदविला.
तर शिवसेना करणार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा
भाजपच्या आरोपानंतरच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता तेच देवेंद्र फडणवीस संजय राठोड यांना शुद्ध करून घेतील काय, यवतमाळचे भाजप आमदार मदन येरावार यांनी संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणात नाॅट रिचेबल असताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या संकटात शिवसेना व स्थानिक शिवसैनिकांनी संजय राठोड यांना साथ दिली. आता हेच आमदार संजय राठोड भाजपच्या गोटात जात आहेत. भाजपसोबत गेल्यानंतर आमदार मदन येरावार यांच्या मांडीला मांडी लावून बसतील, यांची ही कुठली नैतिकता, असा प्रश्नही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात बंडखोर आमदार संजय राठोड यांच्यावर बोचरी टीका केली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा यवतमाळातील शिवसेना पदाधिकारी पाठपुरावा करतील असे सांगतानाच या प्रकरणातील बाहेर आलेले व्हिडिओ केवळ ट्रेलर होते. आमच्याकडे ५९ मिनिटांचा व्हिडिओ आहे. याशिवाय राठोड यांची इतरही काळी प्रकरणे बाहेर काढू असा इशारा देत संजय राठोड यांनी बंजारा समाजाची फसवणूक केल्याचा घणाघातही आपल्या भाषणातून केला.