यवतमाळ: ज्या पक्षाने मोठे केले, त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून संजय राठोड आता भाजपच्या वाटेवर आहेत. उद्या कदाचित भाजप संजय राठोड यांच्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरही पांघरुन घालेन. मात्र आता हे प्रकरण शिवसैनिक लावून धरतील, पूजा चव्हाण प्रकरणातील बाहेर आलेले व्हिडीओ हा केवळ ट्रेलर होता. आमच्याकडे ५९ मिनिटांचा व्हिडीओ आहे तो आम्ही योग्य वेळी बाहेर काढू, अशा शब्दात यवतमाळातील शिवसैनिकांनी आमदार संजय राठोड यांना इशारा दिला आहे.
आमदार संजय राठोड यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ येथील दत्त चौकात जिल्हाभरातील शिवसैनिकांनी निदर्शन आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी आमदार राठोड यांचा खरपूस समाचार घेतला. राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात खळबळ उडवून दिली. आमदार राठोड यांचा यवतमाळमध्ये आल्यानंतर येथील शिवसैनिक समाचार घेतील.
राठोड यांना भाजप या पुढील काळात पवित्र करून घेणार असली तरी आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत राहू. केवळ पूजा चव्हाण प्रकरणच नव्हे तर आमदार राठोड यांची अशी अनेक प्रकरणे असल्याचा आरोप करीत ही प्रकरणेही बाहेर काढू, आमदार राठोड यांनी कशा प्रकारे बंजारा समाजाची फसवणूक केली, याचा पाढाही पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून वाचला. भाजपने पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण संजय राठोड यांच्या विरोधात मोहीम उघडली होती.
संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी भाजपने दबाव टाकला. इतकेच नव्हे तर यवतमाळातील भाजप आमदार मदन येरावार यांनीसुद्धा संजय राठोड यांच्या नॉट रिचेबल असल्याबाबत त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. आता अशा भाजपसोबत आमदार संजय राठोड जाण्याची तयारी करीत आहे. हे कृत्य निषेधार्य आहे. अशा शब्दात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे, शहर अध्यक्ष नितीन बांगर, बाबूपाटील जैत, नितीन माकोडे, प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, चितांगराव कदम, ॲड. बळीराम मुटकुळे, दिगंबर मस्के आदी उपस्थित होते.