महागाव : नगरपंचायत अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेकरिता निघाले. आरक्षणापूर्वी बांधण्यात आलेले सत्तेचे गणित आता पूर्णत: बदलले असून, सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेना, काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
यवतमाळमधील महागाव येथे काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा झाल्यास काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. परंतु स्थानिक स्तरावर या दोन्ही पक्षांतील प्रमुख आणि त्यांच्या पाठीराख्यांत विस्तव आडवा जात नाही. काँग्रेस आणि सेना एकत्र बसू नये, अशी इच्छा काही नगरसेवकाची आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा काँग्रेसजवळ असल्या तरी त्यांना विरोधकाची भूमिका निभवावी लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सेना-भाजप यांच्यात फार काही सख्य नाही. परंतु काँग्रेसमधील उतावीळ नेत्यांना शह देण्यासाठी ते एकत्र येण्याचा विचार करू लागले आहे. भाजपजवळ ओपन महिला अध्यक्षपदासाठी रंजना दीपक आडे या एकमेव उमेदवार आहे. सेनेला अध्यक्षपद देऊ केल्यास अनुसूचित जातीमधून करूना नारायण शिरबिरे, तर अनुसूचित जमातीमधून सुनिता डाखोरे या दोन महिला उमेदवार आहेत. रंजना आडे यांना अध्यक्षपद देऊन उपनगराध्यक्षपदी सेनेचे रामराव पाटील नरवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपने समोर केला आहे.
सन्मानपूर्वक तोडगा काढायचा झाल्यास सेनेला अध्यक्षपद, भाजपाला उपनगराध्यक्ष पद आणि सर्व सभापती पदे त्यांनी स्वतः कडे ठेवावे, असा प्रस्ताव सेनेकडून भाजपसमोर करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसमध्ये सर्वच आलबेल आहे असे मुळीच नाही. त्यांचे दोन नगरसेवक बंड करतील, अशी शंका जाहीरपणे उपस्थित केली जात आहे.
शहर अध्यक्ष म्हणून यापूर्वी मध्यस्थाची भूमिका निभावली. परंतु ठरल्याप्रमाणे वचनपूर्ती झाली नाही. आम्ही तोंडघशी पडलो. ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून मी या प्रक्रियेतून अलिप्त आहे. राजकारण हे विश्वासावर चालते, पैशावर नाही. शेवटी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली, तर स्वागतच आहे.
- आरिफ सुरय्या, शहराध्यक्ष, काँग्रेस
सत्ता स्थापनेसाठी पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश पालन करूच. परंतु जनभावनेचा विचार तेवढाच महत्त्वाचा आहे.
- प्रमोद भरवाडे, नगरसेवक तथा तालुकाप्रमुख शिवसेना