सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील शिवसेना भाजपा युतीत उघड उघड धुसफूस सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून सभांमध्ये भाजपाच्या धोरणाचा समाचारही घेतला जातो. आता हे युद्ध रस्त्यावर आले असून यवतमाळात शिवसेनेने भाजपाच्या धोरणावर जाहीर टिका करणारे फलक लावले आहे. यावरून शिवसेना भाजपला कमी दाखवण्याची कोणतीच संधी सोडण्यास तयार नाही असे दिसून येते.जिल्ह्यातील शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून पुरेपूर प्रयत्न झाले आहेत. सहपालकमंत्रीपद देवून शिवसेनेला सत्तेतही दुय्यम स्थानावर ठेवण्यात आले. तेव्हापासूनच पक्षांतर्गत वादावादी सुरू आहे. आता शिवसेनेने फलकबाजी करत भाजपा विरोधी मोहीमच उघडल्याचे दिसून येते. काश्मिरातील लष्करी हल्ल्याचा हवाला देत शिवसेनेने भाजपाच्या देशभक्तीचा फोलपणा दाखवून दिला आहे. ‘हा आपला भाजपा’ या मथळ्याखाली भाजपा व पिडीपा सरकारने काश्मिरात लष्करी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदविल्याची घटना ठळकपणे मांडली आहे. तर याच फलकावर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात शिवसेनेच्या अखत्यारित असलेल्या परिवहन मंडळाकडून राबवली जात असलेली दिवंगत बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची जाहिरात करण्यात आली आहे. शहीद कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी व प्रवासातील सवलतीची घोषणा यातून करण्यात आली आहे. शहीद सन्मान योजनेचा आधार घेत भाजपाच्या कश्मिरातील लष्कराविरोधी कारवाईचा एकप्रकारे निषेध केला आहे. भाजपासोबत सत्तेत राहून शिवसेना नेहमीच विरोधकाची भूमिका पार पाडत होती. आता शिवसेनेची उघड भूमिका जाहीर झाली आहे. कुठल्याही मुद्यावर भाजपाला गल्लीतही सोडायचे नाही हा अजेंडा राबविला जात आहे. यातूनच शहरात फलकबाजीला उधाण आले असून भाजपाचा जाहीर निषेध करणारे फलक शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नावाने लावण्यात आले आहे.
भाजपाच्या भूमिकेकडे लक्षशिवसेनेने फलकबाजीच्या माध्यमातून केलेले आक्रमण स्थानिक भाजपा कोणत्या पद्धतीने परतवून लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.