बाभूळगाव येथे शिवसेनेचा तर राळेगावात काँग्रेसचा नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 05:00 AM2022-02-10T05:00:00+5:302022-02-10T05:00:13+5:30

नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार निर्धारित वेळेत राळेगाव येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र शेषराव शेराम यांचेच दोन अर्ज दाखल झाले. छाननीत ते वैध ठरले. त्यामुळे राळेगाव येथे काँग्रेसचे शेराम हे नगराध्यक्षपदी आरूढ होणे निश्चित झाले आहे. बाभूळगाव येथे महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या उमेदवार संगीता मालखुरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

Shiv Sena in Babhulgaon and Congress in Ralegaon | बाभूळगाव येथे शिवसेनेचा तर राळेगावात काँग्रेसचा नगराध्यक्ष

बाभूळगाव येथे शिवसेनेचा तर राळेगावात काँग्रेसचा नगराध्यक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींची निवडणूक आटोपल्यानंतर बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. यात राळेगाव आणि बाभूळगाव येथे काँग्रेसशिवसेना उमेदवारांचा एकच अर्ज दाखल झाल्याने तेथे काँग्रेस व शिवसेनेचा नगराध्यक्ष आरूढ होणार आहे. मात्र, महागाव येथे तिढा कायम आहे. कळंब येथे काँग्रेस, झरी येथे काँग्रेस व शिवसेना तर मारेगाव येथे काँग्रेस, शिवसेना व भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार निर्धारित वेळेत राळेगाव येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र शेषराव शेराम यांचेच दोन अर्ज दाखल झाले. छाननीत ते वैध ठरले. त्यामुळे राळेगाव येथे काँग्रेसचे शेराम हे नगराध्यक्षपदी आरूढ होणे निश्चित झाले आहे. बाभूळगाव येथे महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या उमेदवार संगीता मालखुरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरल्याने बाभूळगाव येथेही शिवसेनेच्या मालखुरे अविरोध नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी अधिकृत घोषणा १४ फेब्रुवारीला होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
कळंब, मारेगाव आणि झरी येथे कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. बुधवारी कळंब येथे काँग्रेसतर्फे सिद्दीकी अफरोज बेगम फारुख अहमद यांनी दोन अर्ज दाखल केले. अपक्ष अब्दूल अमरीनजहा अजीज यांनीही नामांकन भरले. त्यामुळे कळंबमध्ये जवळपास काँग्रेसचेच सिद्दीकी अफरोज बेगम फारुख अहमद हे नगराध्यक्षपदी विराजमान होणे निश्चित मानले जात आहे. 
मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत काहीही सांगणे अवघड आहे. मारेगाव येथे काँग्रेसतर्फे नंदेश्वर खुशाल आसूटकर, भाजपतर्फे हर्षा अनुप महाकूलकर तर शिवसेनेतर्फे मनीष तुळशीराम मस्की यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी मागे घेतल्यानंतरच तेथील चित्र स्पष्ट होणार आहे.
झरी येथे शिवसेनेतर्फे ज्याेती संजय बिजगुणवार तर काँग्रेसतर्फे सुजाता श्रीकांत अनमूलवार यांनी नामांकन दाखल केले आहे.  उमेदवारी मागे घेतल्यानंतर तेथील चित्र स्पष्ट होईल.
 

महागावमध्ये उलथापालथीची शक्यता, अभद्र युती होण्याचे संकेत 

- महागाव नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. तेथे भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता ‘लोकमत’ने वर्तविली होती. बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे सुरेखा विनोद सुरोशे (कोपरकर), सुनंदा दिलीप कोपरकर आणि जयश्री संजय नरवाडे या तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपतर्फे रंजना दीपक आडे तर शिवसेनेतर्फे करुणा नारायणराव शिरबिरे यांनीही अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल झाल्याने, महागाव येथील तिढा वाढला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जयश्री नरवाडे यांच्या अर्जाला भाजप नगरसेवक सुरेश नरवाडे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहे. महागाव येथे भाजप व शिवसेना यांची अलिखित युती झाली असून, नगराध्यक्षपद प्रत्येकी सव्वा वर्ष वाटून घेणार असल्याचे पडद्याआड ठरले आहे. या दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत.
 

 

Web Title: Shiv Sena in Babhulgaon and Congress in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.