लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’चे संग्रहालय उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून गुरुवारी करण्यात आली. शिवसेनेने यवतमाळ शहरातील दत्त चौकासह जिल्ह्याच्या विविध भागात या मागणीसाठी निदर्शने केली. दत्त चौकात दुपारी या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांसह भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भाजप हमसे डरती है, इडी को आगे करती है’ अशा घोषणांनी दत्त चौक परिसर दणाणून निघाला. कधी स्मारकाच्या तर कधी मंदिराच्या नावाखाली भाजप नेते देशातील पैसे लुटत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्यातील ईडीचे कार्यालय भाजपचे झाल्याचे सांगत शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे, हा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणात भाजपावर टीका केली. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, राजूदास जाधव, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, गोपाळ पाटील, संजय रंगे, नितीन बांगर, सचिन राठोड, निर्मला विणकरे, अंजली गिरी, कल्पना दरवाई, गजानन पाटील, विशाल गणात्रा, डॉ. प्रसन्न रंगारी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
भाजपाविरोधात शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2022 5:00 AM